"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:09 AM2024-10-19T11:09:20+5:302024-10-19T11:15:44+5:30
जागा वाटपावरुन सुरु असलेल्या महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या अडथळ्यांवर संजय राऊत यांनी भाष्य केलं.
Sanjay Raut VS Nana Patole : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. जागा वाटपासाठी होत असलेल्या वेळेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट दिल्लीत चर्चा करणार असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे नाना पटोले व संजय राऊत यांच्यात विसंवाद वाढल्याचे बोललं जात आहे. आपण थेट काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. याबाबत नाना पटोले यांनीही संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं प्रत्युत्तर दिलं आहे. आता खासदार संजय राऊत यांनी मी नाना पटोलेंविषयी बोललो नसल्याचे म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अद्याप चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच जागावाटपाबाबत ठाकरे गट आता थेट काँग्रेस हायकमांडशी बोलणार आहे. खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी बोलणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर नाना पटोले जागावाटपाच्या चर्चेसाठी उपस्थित असतील तर आम्ही बैठकीला येणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने घेण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र यात तथ्य नसल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केलं. मात्र मविआच्या शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांविषयी विचारलेल्या प्रश्नावरुन नाना पटोले काहीसे संतापलेले वाटले. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं होतं. त्यावर आता संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
"संजय राऊत हे कदाचित उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा मोठे नेते असतील. त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलावे लागत नसेल. पण आमच्या पक्षात एक प्रोटोकॉल आहे. आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहेत. आम्हाला सर्व निर्णयांची माहिती त्यांना द्यावी लागते. तिकडे जयंत पाटील यांना सर्व माहिती शरद पवारांना द्यावी लागते. कदाचित शिवसेनेत ही पद्धत नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे,” असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.
"मी नाना पटोलेंविषयी बोललो नाही. माझ्या तोंडी घालू नका. मी कोणावरही व्यक्तीगतरित्या कोणावरही मतप्रदर्शन केलेलं नाही. तेवढी सभ्यता आणि सुसंस्कृतपणा आमच्यामध्ये आहे. प्रत्येकवेळी आघाड्या तयार होतात तेव्हा अशा प्रकारचे अडथळे निर्माण होतात. भाजप शिवसेना एकत्र होते तेव्हाही अडथळे होते. काँग्रेस पक्ष मोठा आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष असून राष्ट्रीय पक्षांनी त्या त्या पक्षांना राज्यात स्थान दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. प्रादेशिक पक्षांच्या जोरावर सध्या राष्ट्रीय राजकारण सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त प्रादेशिक पक्ष आहेत. आमची सगळ्यांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे दिल्लीच्या हायकमांडकडून रमेश चेन्नीथला यांना चर्चा करण्यासाठी पाठवलं आहे," असं संजय राऊत म्हणाले.
"मी कधीही कोणावर व्यक्तिगत टिका टिप्पणी केलेली नाही. माझी भूमिका ही धोरणात्मक आणि पक्षाची असते. मी उद्धव ठाकरेंच्या परवनागी शिवाय कधी काहीही बोलत नाही. नाना पटोले चर्चेसाठी नको अशा प्रकारच्या भूमिका आम्ही मांडल्याचे मला आठवत नाही. अशा प्रकारच्या भूमिका कोणी घेत नाही. तसं कोणी इतर पक्षांनी सांगितले तर मला माहिती नाही," असंही संजय राऊत यांनी म्हटलं.