तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 07:06 PM2023-04-21T19:06:42+5:302023-04-21T19:07:31+5:30
संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.
मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीचे आमदार आणि वरिष्ठ नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र, अजित पवारांनी याबाबत खुलासा करत, मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच असणार आहे, असे अजित त्यांनी स्पष्ट आहे. मात्र, यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली. ठाकरेंच्या शिवसेना गटाचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार असल्याचे म्हटले होते. अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील जुगलबंदीवर आता भाजप नेतेही व्यक्त होत आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. त्यावर नारायण राणे यांनी कोण संजय राऊत, मी ओळखत नाही. कोणत्यातरी प्रतिष्ठित माणसाचे नाव घ्या, असे सांगत राऊत यांना धुडकावून लावले. तर, अजित पवार यांनीही कोण संजय राऊत? असे म्हणत संजय राऊत यांचं महत्त्व आपल्यादेखी नसल्याचं पत्रकारांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. राऊत आणि पवार यांच्यातील या वादावरुन भाजप नेते संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत.
खासदार संजय राऊत हे जेलमधून आल्यानंतर बावचळले आहेत. वारंवार कोर्टाचा अवमान करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांना वटणीवर आणू शकले नाही आहेत, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली. तसेच, अजित पवार यांच्या विधानाचा संदर्भ देत, अजित पवार यांनी कोण संजय राऊत अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे, अशी आठवणही दरेकर यांनी सांगितली.
अनिल बोंडे यांनीही केली टीका
संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांच्या सांगण्या वरूनच संजय राऊत हे अजित पवार यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढतील, असे विधान भाजप खासदार अनिल बोंडें यांनी केलंय. शिवसेनेतील ४० आमदार संजय राऊत यांना कंटाळून गेले. अजित पवार हे संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडून जातील, असा गौप्यस्फोटही बोंडे यांनी केला. महाविकास आघाडी फोडायला संजय राऊतच जबाबदार राहतील त्यांची थोरवी मोठी आहे. कारण, शिवसेना फोडण्यातही मोठा वाटा आहे. त्यांनीच, ४० आमदारांना घराच्या बाहेर काढलं, अशा शब्दात बोंडे यांनी संजय राऊतांवर टीका केलीय.