रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 03:01 AM2020-11-01T03:01:54+5:302020-11-01T06:13:39+5:30
Renuka Shahane : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे काँग्रेसचे निरीक्षक एच. के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना ट्विट करून सदर मागणी करण्यात आली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांचा तिढा महाराष्ट्रात सुटला नसताना मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील लाेकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या नावाची मागणी करून चर्चेचा धुरळा उडवला.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे काँग्रेसचे निरीक्षक एच. के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना ट्विट करून सदर मागणी करण्यात आली. जुन्नरकर यांच्या मते काँग्रेसने नेहमीच चांगल्या अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू यांना राज्यसभा, विधानसभेत पाठवून त्यांच्या कार्याचा बहुमान केला आहे. काँग्रेसकडे विधान परिषदेच्या ४ जागा आहेत. आजच्या परिस्थितीत राज्यपाल हे कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान यासंदर्भातच विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जेथे मोठमोठे नेते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात तेथे ‘हम आपके है काैन’ चित्रपटामुळे लाेकप्रिय झालेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी बिनधास्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘खरी तुकडे तुकडे गॅंग तुमची आयटी सेल आहे,’ असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले हाेते, याची आठवण जुन्नरकर यांनी करून दिली. अभिनेत्री कंगना रनाैेत प्रकरणात त्यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्राची उत्तम बाजू मांडली होती. रेणुका शहाणे यांना विधान परिषद मिळाल्यास त्या अजून जोमाने काम करतील व गरजूंना न्याय देतील. प्रत्येक चालू घडामोडीवर त्या अभ्यासपूर्ण ट्विट करतात. त्यामुळे त्यांच्यासारख्या अभ्यासू, निर्भीड आणि विद्वान व्यक्तीचे काँग्रेसने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव द्यावे, अशी मागणी आपण काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे जुन्नरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.