महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 04:08 PM2019-11-03T16:08:12+5:302019-11-03T16:41:57+5:30
सत्तेच्या वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दहा दिवस उलटले तरीही दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करता आलेली नाही.
मुंबई- सत्तेच्या वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दहा दिवस उलटले तरीही दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करता आलेली नाही. अशातच राज्याच्या सध्याच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावणारी बातमी येऊन धडकली होती. महायुतीनं सरकार स्थापन न केल्यास शरद पवार आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा दावा करतील, अशीही एक अटकळ बांधली जात होती. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नावाला शिवसेना आणि काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास उपमुख्यमंत्रिपदाची माळ आदित्य ठाकरेंच्या गळ्यात पडेल, अशीही चर्चा होती. परंतु असं काहीही होणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे.
मी 30 वर्षं आमदार म्हणून काम केलेलं आहे. ज्या गोष्टी पाहण्यात आल्या, त्याच्याबद्दल सूतोवाच केलं. त्यातून काहींनी कारण नसताना वेगळा अर्थ लावला. त्या अर्थाला काडीचाही आधार नाही. शिवसेनेबरोबर सत्ता स्थापनेशी साहेबांचा दुरान्वये संबंध येत नाही. चांगल्या लोकांच्या हातात महाराष्ट्र दिला गेला पाहिजे ही साहेबांची भावना होती. म्हणून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांना बदल करायचा होता, त्याकरिता ते प्रयत्नशील होते. त्यांच्याकडे 175 हा आकडा कसा आहे ते तेच सांगू शकतील. मी त्याबद्दल अधिकारवाणीनं सांगू शकत नाही.
महाआघाडीकडे जवळपास 110 आमदार आहेत. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेनं दिलेला आहे. महायुतीनं लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि राज्यातील जे आवासून उभे प्रश्न आहेत. त्यांना ताबडतोब कसा न्याय देता येईल, याबद्दलचा प्रयत्न करावा. आम्ही महाआघाडी म्हणून निवडणूक लढतो आहोत. त्यामुळे सत्तेत जायचं की नाही हे दोन्ही पक्ष मिळून ठरवतील. पण हा निर्णय घेण्याची वेळच येणार नाही. कारण आमच्या समोर असलेल्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही हा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि शरद पवार घेतील. राजकारणात कोणीही कायमचं शत्रू नसतो, की कायमचा मित्र नसतो, असंही ते म्हणाले आहेत.