विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 02:42 PM2024-08-24T14:42:17+5:302024-08-24T14:43:46+5:30

मुंबईतल्या जागांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे. कारण सेनेच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. 

Sharad Pawar NCP claim on 'these' 7 seats in the Maharashtra Assembly Election in Mumbai; The names of the aspirants also came out | विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली

विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली

मुंबई - शहरातील ३६ मतदारसंघापैकी कोण किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला महाविकास आघाडीत जवळपास निश्चित झाल्याचं समोर आले आहे. त्यात उद्धव ठाकरे गट १५, काँग्रेस १४ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ७ जागांवर उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. आता मुंबईतल्या शरद पवार गटाकडून लढवल्या जाणाऱ्या त्या ७ जागा कोणत्या असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. त्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुंबईतल्या ७ जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यात घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा यासह जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर आणि मलबार हिल या जागांवरही पवार गटाने दावा केला आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून राखी जाधव, कुर्ल्यातून माजी आमदार मिलिंद कांबळे, वर्सोव्यातून नरेंद्र वर्मा, जोगेश्वरीतून अजित रावराणे, दहिसरमधून मनिष दुबे, अणुशक्तीनगरमधून सोहेल सुभेदार आणि मलबार हिलमधून क्लाईड क्रास्टो हे लढण्यास इच्छुक असल्याचं समोर आले आहे. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे. 

शरद पवार गटाकडून या जागांबाबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिकांच्या रुपाने अणुशक्तीनगर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. मात्र मलिक हे अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवार गटाला मुंबईतून जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ७ जागा शरद पवार गटाने मागितल्याची सूत्रांच्या हवाल्याने माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, मुंबईतल्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची आज बैठक होणार असून या बैठकीत नेमक्या किती जागा शरद पवारांच्या गटाला मिळतात हे पाहावे लागेल. राष्ट्रवादीनं दावा केलेल्या जागांवर जोगेश्वरी, कुर्ला या जागेवर शिवसेनेनं २०१९ मध्ये विजय मिळवला होता. मात्र पक्षातील फुटीनंतर हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. तर दहिसर विधानसभा मतदारसंघातून उबाठाचे विनोद घोसाळकर हे लढण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे ठाकरे गट या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार का हा मोठा प्रश्न आहे. 

लोकसभा निकालानुसार मविआ २० जागांवर आघाडी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधारे, महाविकास आघाडी मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभा जागांपैकी २० जागांवर पुढे आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपासोबत युतीत लढली होती त्यात १९ जागांवर निवडणूक लढवून १४ जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसने २९ जागांवर निवडणूक लढवली आणि ४ जिंकल्या. तर राष्ट्रवादीने ६ जागांवर निवडणूक लढवली होती आणि फक्त एका जागेवर विजय मिळाला. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाने बाजी मारली होती. लोकसभेत समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला समाजवादी पक्ष वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Sharad Pawar NCP claim on 'these' 7 seats in the Maharashtra Assembly Election in Mumbai; The names of the aspirants also came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.