Sharad Pawar | सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट... पहिला शरद पवारांची निवृत्ती, दुसरा काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 04:05 PM2023-05-02T16:05:42+5:302023-05-02T16:06:48+5:30
Sharad Pawar Retirement Maharashtra Politics: शरद पवारांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली
Sharad Pawar Retirement, Supriya Sule, Maharashtra Politics: शरद पवार यांनी मंगळवारी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडे अजित पवार यांची भाजपशी जवळीक असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या सर्व परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी मुंबईतील वाय.बी.चव्हाण केंद्रातून घोषणा केली की, ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी भाकरी फिरवणारे विधान केले तेव्हा राष्ट्रवादीत काहीतरी मोठे घडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. त्याचवेळी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट होतील, असे सांगितले होते. एक महाराष्ट्रात आणि दुसरा दिल्लीत. अशा स्थितीत शरद पवारांनी पहिला गौप्यस्फोट केला की काय, असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे, आता दुसरा राजकीय धमाका काय होऊ शकतो हे फारच रंजक आहे.
आता दिल्लीतून आणखी एक राजकीय धमाका?
भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे कारण भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते, असे शरद पवार यांनी नुकतेच सांगितले होते. म्हणजेच नेतृत्व बदलाची हीच योग्य वेळ असल्याचे संकेत पवारांनी दिले होते. यानंतर काही दिवसांनी शरद पवारांनी वाय.बी.चव्हाण केंद्रातून भाकरी फिरवली की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली असे बोलले जात आहे. म्हणजेच पहिला राजकीय स्फोट महाराष्ट्रातून झाला आहे. आता प्रश्न पडतो की दुसरा राजकीय स्फोट काय असू शकतो? दुसरा राजकीय धडाका दिल्लीतून येईल, असे सुळे म्हणाल्या होत्या. शिवसेनेच्या या १६ बंडखोर आमदारांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरुद्ध निघाला तर एकनाथ शिंदे यांना झटका बसेल आणि महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे उदयास येऊ शकतील. सुप्रिया सुळे यांनी हे विधान अशा वेळी केले होते, जेव्हा अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. त्यामुळे या विधानाला बराच मोठा अर्थ आहे असे म्हटले जात आहे.
पवारांच्या राजीनाम्याचा अर्थ काय?
शरद पवार यांचा राजीनामा एका प्रकारे समजून घेतला पाहिजे की, राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्रभरातील त्यांच्या कट्टर समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना पहिल्यांदा मुंबईत बोलावले. सर्वपक्षीय नेत्यांना वायबी चव्हाण केंद्रात बोलावण्यात आले. कार्यक्रम संपण्यापूर्वीच शरद पवार यांनी अचानक राजीनामा देण्याचा मास्टरस्ट्रोक खेळला. यानंतर शरद पवार यांच्या समर्थक आणि नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर घडत होता, कारण पुस्तकाच्या प्रकाशनाला संपूर्ण मीडिया उपस्थित होता.