शरद पवार म्हणाले, 'रिमोट कंट्रोल नाही, संवाद हवा'; उद्धव ठाकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:11 AM2020-07-26T10:11:58+5:302020-07-26T10:34:33+5:30
Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मुंबई : लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही. सध्याचे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एका पक्षाचे सरकार नाही. त्यामुळे मित्रपक्षांसोबत संवाद हवा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ्या खुबीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका मुलाखतीदरम्यान सुनावले होते. यावर सुरूवातीच्या काळात काही प्रमेळ आक्षेप होता. मात्र, तो गैरसमज माझ्या भेटीनंतर दूर झालेला आहे. शरद पवार यांच्याशी माझा चांगला संवाद आहे. तसेच, कधीतरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही फोन करतो, असे सांगत राज्यातील सरकार रिमोटने नाही, तर संवादाने चालत असल्याची प्रांजळ कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सडेतोड दिली. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
या तीन पक्षांतले जे प्रमुख पक्ष आहेत...शिवसेना आहेच... काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे...त्यापैकी काँग्रेसचं असं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री राष्ट्रवादीला झुकतं माप देताहेत... असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसजम मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे आणि तो आक्षेप अगदी तीव्र नव्हता. शेवटी असं आहे, सगळेच जण निवडणुका लढवून येत असतात. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात, म्हणून तर जनता त्यांना मत देते आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांची चूक आहे अशातला भाग नाही आहे. तशा आशाअपेक्षा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आहे. तुम्ही म्हणता तसं सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात काही असेलही, पण माझ्याशी कुणी असे ठामपणाने बोलले नाही की, तुम्ही आम्हाला विचारत नाही. माझा पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनियमाने नाही, पण कधीतरी मी सोनियाजींना फोन करत असतो." (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी शिवसेनेत नेत्याने आदेश द्यायचा व सैनिकांनी त्याचे अनुकरण करायचे हा शिरस्ता आहे. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया ही शिवसेनेसारखी नसून चर्चा, संवादाच्या माध्यातून होणारी आहे. सध्याचे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एका पक्षाचे सरकार नाही. त्यामुळे मित्रपक्षांसोबत संवाद हवा, असे शरद पवार यांनी मोठ्या खुबीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका मुलाखतीदरम्यान सुनावले होते.
अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना पवार यांनी बाळासाहेबांशी सुसंवाद होता. शिवसेनेच्या आताच्या नेतृत्वापेक्षाही अधिक सुसंवाद होता, असे जाहीर करून टाकले आहे. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही. रिमोटवर सरकार चालवणे आपल्याला मान्य नाही, असे शरद पवार यांनी पुतिन यांचे उदाहरण देत स्पष्ट केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची जुनी कार्यपद्धती बदलण्याचा व सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
पाहा व्हिडीओ