महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:26 PM2020-03-11T16:26:24+5:302020-03-11T17:41:49+5:30
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारबाबतही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.
मुंबई - मध्य प्रदेशमधील मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होऊन कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर झाले आहे. दरम्यान, कमलनाथ सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारबाबतही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आकारास आणणारे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मोठे विधान केले आहे.
काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मध्य प्रदेशात जे काही घडते तसे महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी होऊन राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यातील सरकारच्या भवितव्याबाबत उपस्थित होत असलेल्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत सुमारे २० हून अधिक आमदारांनी बंड केल्याने कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे. राज्यातील सरकार टिकवण्यासाठी कमलनाथ आणि काँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच बंडखोर आमदारांची समजूत घालून त्यांना परत बोलावण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तर संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी भाजपाकडूनही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी भाजपाने आपल्या सर्व आमदारांना राज्याबाहेर हलवले आहे. तर काँग्रेसनेही आपल्या उर्वरित आमदारांची रवानगी जयपूरला केली आहे.
संबंधित बातम्या
'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात'
“चिंता नसावी! मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही”
मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर राहुल गांधी म्हणतात...
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवजणुकीसाठी शरद पवार यांनी आज विधानभवन येथे महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले.