शिंदे-फडणवीस सरकारचं आता छट पूजेतही विघ्न; परवानगी दिल्यानंतर पालिकेचं घुमजाव, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 08:25 AM2023-11-16T08:25:39+5:302023-11-16T08:26:58+5:30
परंपरागत छट पूजेला परवानगी देऊन पालिकेचे घुमजाव, मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचा आरोप
मुंबई : नवरात्री आणि दसऱ्याच्या वेळी आझाद मैदानातील रामलीलेत विघ्न आणणाऱ्या शिंदे-भाजप सरकारने आता छट पुजेलाही विरोध केला आहे. कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात गेली अनेक वर्षे राजपत सेवा मंडळातर्फे आयोजित होणाऱ्या छट पुजेला महापालिकेने परवानगी देत नंतर घुमजाव केले. ही छटपुजा काँग्रेसच्या माजी नगरसेवकांकडून आयोजित केली जात असल्याने भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या सांगण्यावरून पालिकेने असा पवित्रा घेतला आहे, अशी टीका मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.
कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरातील महाराणा प्रताप उद्यानात गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचे माजी नगरसेवक राजपत आणि अजंता यादव हे दांपत्य त्यांच्या राजपत सेवा मंडळातर्फे छटपुजा आयोजित करतात. भाविकांना दूर समुद्रकिनारी जाऊन पूजा करावी लागू नये, यासाठी त्यांनी या उद्यानात सात छट कुंड उभारली आहेत. यंदाही छट पुजेच्या आयोजनासाठी त्यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती. ६ नोव्हेंबर रोजी पालिकेने त्यांना परवानगी दिल्यावर त्यांनी अनामत रक्कम म्हणून एक लाख रुपयेही पालिकेत भरले. त्यानंतर अचानक पालिकेने राजपत सेवा मंडळाला परवानगी नाकारल्याचे कळवले. तसेच भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या सांगण्यावरून ही परवानगी नाकारण्यात आल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
आता मिळालेल्या माहितीनुसार, पालिका प्रशासनाला या जागेवर कार्यक्रम आयोजित करायचा आहे. या प्रकरणी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रशासनावर टीका केली असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित मंडळाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांना परवानगी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पैसेही भरले, मग अचानक ही परवानगी का रद्द केली, शहरातील सार्वजनिक ठिकाणं ही काय राज्य सरकार आणि पालिकेची खासगी मालमत्ता आहे का, महापालिका फक्त सत्ताधाऱ्यांना सुविधा पुरवणार का, असे रोखठोक सवाल मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले. त्याचबरोबर भाजप आणि शिंदे सरकार त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या श्रद्धेशी खेळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
छट पूजा काँग्रेसच आयोजित करणार!
रामलीलेच्या वेळीही शिंदे सरकारने रावण वध एक दिवस आधीच करायला सांगितला. आता छट पूजेतही हे सरकार विघ्न आणत आहे. पण काँग्रेस या धमकावणीला घाबरणार नाही. आम्ही छट पूजा इथेच आयोजित करणार. शिंदे-भाजप सरकारने लोकांच्या श्रद्धेसह खेळ करणे बंद करावे.
– प्रा. वर्षा गायकवाड, अध्यक्षा, मुंबई प्रदेश काँग्रेस