Shiv Jayanti: ३९१ झाडं लावू या; छत्रपती शिवरायांना 'शाश्वत' मानवंदना देण्याची अमोल कोल्हेंची साद
By मुकेश चव्हाण | Published: February 17, 2021 07:16 PM2021-02-17T19:16:51+5:302021-02-17T19:23:12+5:30
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात.
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती (Shivjayanti) कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनं नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं सरकारनं सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजंयती उत्सव साजरा केला जाणार आहे. याचदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना शाश्वत मानवंदना देण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे तरुणांना साद घातली आहे.
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीच्या निमित्ताने अमोल कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर ३९१ देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली- स्वराज्य. त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ देऊ या. शिवजयंतीला प्रत्येक गावानं ३९१ झाडे लावू या, ती जगवू या, असं आवाहन अमोल कोल्हे यांनी तरुणांना केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली- स्वराज्य! त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ देऊ या. शिवजयंतीला प्रत्येक गावानं ३९१ झाडे लावू या, ती जगवू या!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 15, 2021
या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या! pic.twitter.com/RAEK0PSWOb
अमोल कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर ३९१ देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पाची व्याप्ती वाढवत अमोल कोल्हे यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतींना ३९१ देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे.
राज्य सरकारच्या काय आहेत मार्गदर्शक सूचना? (Rules for Shivjayanti Celebration in Maharashtra)
१) अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
२) दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
३) कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
४) शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिमिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
५) आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,
६) Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे