आमच्याकडे बहुमत, अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा; निकालाआधी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:56 PM2024-01-10T12:56:17+5:302024-01-10T12:59:22+5:30

गेल्या दीड वर्षांत आम्ही जी कामे केली, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव दिसू लागला आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

shiv sena disqualification case We have a majority The Assembly Speaker should decide on merit says cm eknath shinde before verdict | आमच्याकडे बहुमत, अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा; निकालाआधी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

आमच्याकडे बहुमत, अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा; निकालाआधी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

CM Eknath Shinde ( Marathi News ) : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवरील सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करणार आहेत. या निकालापूर्वी शिवसेनेतील दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून ठाकरे गटाने केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "विधानसभा अध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्यासमोर भाष्य करणार आहे. तोपर्यंत मी एवढंच सांगेन की, शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने आम्हाला दिली आहे, तसंच धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने आम्हाला दिलं आहे. विधानसभेत आमच्याकडे ६७ टक्के बहुमत आहे आणि लोकसभेत ७५ टक्के बहुमत आमच्याकडे असल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. पण काही लोकं यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. जे आरोप करतात त्यांचे काही लोक याआधी अध्यक्षांच्या दालनात जेवले आहेत. आम्ही त्यावर आक्षेप घेतला का?" असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. तसंच आमच्याकडे बहुमत असल्याने अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्याकडून देण्यात येणारा निकाल पक्षपाती असू शकतो, अशी शंका ठाकरे गटाकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना शिंदे यांनी म्हटलं की, "काही दिवसांपूर्वी अध्यक्ष माझ्याकडे आले, ते त्यांच्या अधिकृत वाहनातून आले होते. अध्यक्ष रात्री लपून आले नव्हते, दिवसाच्या उजेडात आले होते. त्यांच्या मतदारसंघातील काही विषयांवर चर्चा करायची होती. आमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. एखाद्या संस्थेने त्यांच्या बाजूने निर्णय दिला की ती संस्था चांगली असते, मात्र निर्णय विरोधात गेला की त्या संस्थेवर आरोप केले जातात."

"मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आमच्यावर घटनाबाह्य असल्याचा आरोप करणारेच खरे घटनाबाह्य आहेत. कारण निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टानेही सांगितलं आहे की, माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार अस्तित्वात नव्हतं.  १६४ आमदारांचे बहुमत आमच्याकडे आहे. याशिवाय, गेल्या दीड वर्षांत आम्ही जी कामे केली, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव दिसू लागला आहे," अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

दरम्यान, "आधी सरकार पडणार असं सांगितलं जात होतं, मात्र सरकार काही पडलं नाही. नंतर मुख्यमंत्री बदलणार असं सांगत होते, मात्र मुख्यमंत्रीही बदलला गेला नाही. आजही आमचा व्हिप त्यांना लागू आहे. त्यामुळे तशाच प्रकारचा मेरिटवरील निकाल आज आम्हाला अपेक्षित आहे," अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
 

Web Title: shiv sena disqualification case We have a majority The Assembly Speaker should decide on merit says cm eknath shinde before verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.