पृथ्वीराज चव्हाणांचा दावा शिवसेनेने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 06:17 AM2020-01-21T06:17:57+5:302020-01-21T06:18:43+5:30
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करावे, असा प्रस्ताव शिवसेनेने २०१४ मध्येच दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करावे, असा प्रस्ताव शिवसेनेने २०१४ मध्येच दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे.
शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी या वृत्ताचा इन्कार केला. तेव्हा सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये मी नव्हतो. कोणी कोणाला कोणता प्रस्ताव दिलेला होता याची मला काहीही माहिती नाही. शिवसेनेने प्रस्ताव दिल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण हेच काय ते त्या विषयी अधिक सांगू शकतील पण आपल्या माहितीनुसार तसा कोणताही प्रस्ताव नव्हता, असे परब म्हणाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेते तसा दावा करणार असतील तर शिवसेनेने त्यावर भूमिका मांडायला हवी, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्यावरून २०१४ मध्येच त्यांना आम्हाला धोका द्यायचा होता आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायचे होते. विचारसरणीला मूठमाती देण्याचे तेव्हाच शिवसेनेच्या मनात होते, असे फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीला प्रस्ताव नाही
राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले की शिवसेनेने काँग्रेसकडे काही प्रस्ताव दिला होता की नाही हे माहिती नाही पण शिवसेनेने तसा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीला दिलेला नव्हता.