विजय शिवतारेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; ‘वर्षा’वर रात्री उशिरापर्यंत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:52 AM2024-03-28T07:52:30+5:302024-03-28T07:54:06+5:30

Vijay Shivtare News: विजय शिवतारे यांची मनधरणी करण्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यशस्वी ठरले का, हे लवकरच समजणार असल्याचे सांगितले जात आहे.

shiv sena shinde group vijay shivtare meet cm eknath shinde and dcm devendra fadnavis with dcm ajit pawar at varsha | विजय शिवतारेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; ‘वर्षा’वर रात्री उशिरापर्यंत बैठक

विजय शिवतारेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; ‘वर्षा’वर रात्री उशिरापर्यंत बैठक

Vijay Shivtare News: महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, एका संयुक्त पत्रकार परिषदेतून कोणाला किती जागा मिळणार, जागावाटप कसे असेल, याबाबत जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यापूर्वी महायुतीतील नाराज नेते, पदाधिकारी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. यातच पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेले आणि काही झाले तरी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री विजय शिवतारे यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या  पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले, असे सांगितले जात आहे.

पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतची ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली, असे म्हटले जात आहे. विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका प्रसारमाध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे विजय शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते.

विजय शिवतारे यांच्या भूमिकेकडे लक्ष

बारामती लोकसभा मतदारसंघात काय होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच बारामतीतून निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. जनतेला पर्याय हवा आहे, असे सांगत विजय शिवतारे यांनी पवारांवर जोरदार टीका केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह झालेल्या बैठकीनंतर आता विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहतात की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी शिष्टाई फळाला येऊन माघार घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतर्गत मतभेद विसरून कामाला लागा. मिशन ४५ प्लस डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे उमेदवार विजयी होतील, यावर लक्ष केंद्रीत करा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या होता. महायुतीतील संयुक्त पत्रकार परिषदेत नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: shiv sena shinde group vijay shivtare meet cm eknath shinde and dcm devendra fadnavis with dcm ajit pawar at varsha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.