शिवसेनेने आधी एनडीएमधून बाहेर पडावे, अशोक चव्हाण यांची अट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 05:41 AM2019-11-08T05:41:14+5:302019-11-08T05:41:46+5:30
शिवसेनेने अद्याप काँग्रेसला औपचारिक किंवा अनौपचारिकपणे कसलाही प्रस्ताव दिलेला नाही
अतुल कुलकर्णी
मुंबई : सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेनेने आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडावे, म्हणजे ते भाजपशिवाय अन्य पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवण्यासाठी गंभीर आहेत हे लक्षात येईल. तसे झाले तरच आम्ही दिल्लीत श्रेष्ठींशी बोलू असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. गेले १३ दिवस निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर काँग्रेसची ही पहिली भूमिका समोर आली आहे.
शिवसेनेने अद्याप काँग्रेसला औपचारिक किंवा अनौपचारिकपणे कसलाही प्रस्ताव दिलेला नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिवसेना, राष्टÑवादी यांचे सरकार बनेल आणि काँग्रेस त्याला पाठींबा देईल अशी चर्चा सुरु आहे, त्याबद्दल काँग्रेसमध्ये काय घडत आहे असे विचारले असता चव्हाण म्हणाले, सध्याची राज्यातील राजकीय स्थिती आम्ही दिल्लीत श्रेष्ठींना समक्ष भेटून सांगितली आहे.
मात्र शिवसेना दिल्लीत एनडीएचा घटक असताना, राज्यात ती राष्टÑवादी सोबत सत्ता स्थापन करेल असे बोलले जात आहे, हे योग्य दिसत नाही. त्यासाठीच आधी त्यांनी एनडीए मधून बाहेर पडावे, राज्यात जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर त्यांच्या एकमेव मंत्र्यांने केंद्राचा राजीनामा द्यावा, म्हणजे शिवसेना राज्यात भाजपशिवाय सत्ता स्थापन करण्यासाठी गंभीर असल्याचे लक्षात येईल असे चव्हाण म्हणाले. संजय राऊत आमच्याकडे बहुमत आहे असे सांगत आहेत, तुम्हाला गृहीत धरुन ते हे सांगत आहेत का? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, आमच्याकडे कसलाही प्रस्तावच नाही, तेव्हा ते कशाच्या आधारे बोलतात हे मी कसे सांगणार? खाजगीतही कोणी आपल्याशी बोललेले नाही, असे त्यांनी सांगितले. खा. संजय राऊत आणि राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटी झाल्याची आपल्याला माहिती आहे. त्यावर शरद पवार यांनी काही सूचक विधाने केली आहेत, तेवढी पुरेशी आहेत असेही चव्हाण म्हणाले.
भाजपचा मुख्यमंत्री नको, अन्य कोणाचेही सरकार सत्तेवर यावे असे काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांचे मत आहे हे खरे आहे. अनेक आमदार तसे बोलून दाखवत आहेत, मात्र त्यासाठी कोणते पर्याय असावेत याबद्दल चर्चा झालेली नाही. पक्ष श्रेष्ठींनी राज्यातल्या आमदारांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी भावना असल्याचेही चव्हाण यांनी मान्य केले.
खरगे यांचा मुंबई दौरा रद्द
काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे आजारी असल्यामुळे त्यांनी आपला मुंबई दौरा पुढे ढकलला आहे. तर काँग्रेसचे सुनील केदार, यशोमती ठाकूर, सतेज पाटील यांच्यासह आणखी काही आमदारांनी जवळपास ३० आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन दिल्ली गाठल्याचे वृत्त आहे. ते उद्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते.