पक्षप्रमुखांना सर्वाधिकार देणारी हीच ती बैठक; अनिल परबांनी २३ जानेवारी २०१३ चा व्हिडीओच दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 06:17 PM2024-01-16T18:17:26+5:302024-01-16T18:19:08+5:30
आमदार अपात्रता प्रकरण निकालावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट नाराज असल्याचे वृत्त आहे.
Shiv Sena ( Marathi News ):मुंबई- आमदार अपात्रता प्रकरण निकालावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट नाराज असल्याचे वृत्त आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात, तर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका करण्यात आली आहे. यातच या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे खुली पत्रकार परिषद घेतली असून यात निकालाचे विश्लेषण करण्यात आले आहे.सुरुवातील ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी पक्षांतर बंदी कायद्याची माहिती दिली. यानंतर शिवसेना आमदार अनिल परब यांनी २३ जानेवारी २०१३ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णय सांगितले, आणि या बैठकीतील व्हिडीओ स्वरुपात पुरावे दाखवले.
"लवादाचा निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही"; महापत्रकार परिषदेतून हल्लाबोल
आमदार अनिल परब म्हणाले, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एक चौकट घालून दिली होती. त्या चौकटीत निकाल द्यायचा होता. अपात्र ठरवताना त्यांना राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला फक्त विधीमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही त्यांचा मुळ पक्ष, त्यांची घटना, त्यांची संघटना बघणे गरजेचे आहे. हे बघताना पक्षप्रमुखांना काय अधिकार आहेत, त्या पक्षाच्या पाच वर्षांनी निवडणुका झालेत का नाहीत, हे निकष तपासून घेण्याची गरज होती. पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की, १९९९ नंतर आमच्याकडे रेकॉर्डवरती काही नाही. आणि आमच्याकडे रेकॉर्डवरती काही नसल्यामुळे असा निर्णय देतो की, १९९९ ची जी तुमची घटना आहे ती शेवटची आहे आणि त्यानंतर आमच्याकडे काही नाही. पक्षातील सर्व अधिकारी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच होते. याच्यानंतर हे अधिकार कोणाला दिल्याची नोंद आमच्याकडे नाही. आता बाळासाहेब ठाकरे नसल्यामुळे आम्हाला विधीमंडळाचा हाच पक्ष असं समजून त्यांनी आपलं पक्ष आणि नावही काढून घेतलं, आणि त्याच निकालाची पुनरावृत्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात केली, असा आरोपही आमदार अनिल परब यांनी केला.
"निवडणुका आयोगाने ज्यावेळी आमच्याकडे ज्या गोष्टींची मागणी केली त्यावेळी आम्ही त्या गोष्टींची पुर्तता निवडणूक आयोगात केली आहे. आमच्याबाबतीत सगळीकडे निकाल असे येत असतील तर आता त्यांचा खोटेपणा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा, असंही अनिल परब म्हणाले.
२०१३ च्या बैठकीचा व्हिडीओ दाखवून पुरावाच दाखवला
यावेळी आमदार अनिल परब यांनी २०१३ च्या बैठकीचे व्हिडीओ दाखवले. यात शिवसेनेतील सर्वाधिकार पक्षप्रमुख यांना दिल्याचा ठराव केल्याचे सांगितले. या बैठकीचा त्यांनी व्हिडीओ दाखवला आणि यातील ठरावही दाखवले. या बैठकीत शिवसेनेतील दिग्गज नेते उपस्थित असल्याचे दिसत आहे. याच बैठकीत पक्षाध्यक्षांकडे असणारे अधिकार पक्षप्रमुख यांच्याकडे सोपावण्यात आल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी मांडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ दाखवून आमदार अनिल परब यांनी पुरावा दिला आहे.