एकीकडे दोस्ती करायची अन् पाठीवर वार करायचा; नाना पटोलेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 08:31 AM2022-08-12T08:31:55+5:302022-08-12T08:31:59+5:30
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे.
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, ही नियुक्ती करताना शिवसेनेने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या मित्रपक्षांना विश्वासात घेतले नव्हते. तर दुसरीकडे काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपद मिळावे असे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिले होते.
ठाकरे सरकार कोसळले तरी, राज्यात महाविकास आघाडी कायम आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या परस्पर निर्णयाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटतो आहे. आघाडीत कोणताही निर्णय घेताना मित्रपक्षांशी चर्चा करायला हवी, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील म्हणाले. तर विरोधकांमध्ये एकोपा कायम हवा असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.
अजित पवारांची समन्वयाची भूमिका
विरोधी पक्षांपैकी ज्या पक्षाची संख्या जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता नियुक्त केला जातो. विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला. विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. विधान परिषदेच्या उपसभापतींना शिवसेनेने अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्याचे पत्र दिले. त्यानुसार दानवेंची नियुक्ती करण्यात आली. आम्हीही त्याला मान्यता दिली आहे. यात आता आम्हाला वाद वाढवायचा नाही, अशी समन्वयाची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांडली आहे.
महाविकास आघाडी कायमची नाही
महाविकास आघाडी ही कायमची आघाडी नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काँग्रेस स्वबळावर लढायला तयार आहे. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायचा, ही भूमिका काँग्रेसची नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देताना काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. महाविकास आघाडी म्हणून चर्चा हवी होती. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस