'शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखीच', राधाकृष्ण विखेपाटलांकडून टिकेचे बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 03:56 PM2022-07-07T15:56:54+5:302022-07-07T15:59:23+5:30
शिवसेना आणि शिंदे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे
मुंबई - राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतर नाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. तसेच, पक्षप्रमुखांकडे वारंवार हे गाऱ्हाणे मांडले होते, असेही ते म्हणाले. शिंदेगटाने शिवसेनेला हे मोठं धक्कातंत्र दिल्यामुळे भाजप नेतेही शिवसेनेवर टिका करत आहेत. माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनीही शिवसेनेवर टिका केली आहे.
शिवसेना आणि शिंदे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांबाबत घेतलेली भूमिका आणि बंडखोर नेत्यांकडून सुरू असलेलं समर्थन यामुळे दोन्ही नेत्यांमधील तणाव वाढतच आहे. त्यातच, शिवसेनेकडून खासदार भावना गवळी यांची पक्षाच्या लोकसभा प्रतोद पदावरुन केलेली हकालपट्टी आणि आनंदार अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा दिलेला राजीनामा, यामुळेही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यातच, राधाकृष्ण विखेपाटील यांनी शिवसेनेला काँग्रेसची उपमा दिली आहे.
उद्धव ठाकरेंकडे राहिलेले १५ पैकी अनेक आमदार तसेच १२ हून अधिक खासदार देखील बाहेर पडतील, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भरकटलेलं जहाज आणि बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते एवढीच शिवसेना आता शिल्लक राहिल्याचं सांगत विखे पाटलांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं. तर, शिवसेनेची अवस्था काँग्रेसपेक्षा वेगळी होईल, असं वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, हे विचाराच आणि विकासाचं सरकार असून राष्ट्रवादीच्या नेत्यांची मध्यावधी निवडणुकांचे भाकितं हे नैराश्यातून आल्याचंही ते म्हणाले.
संजय राऊतांवर बंडखोरांचा निशाणा
संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. त्यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला, असे या आमदारांनी म्हटले. इतकेच नाही तर संजय राऊत उरलीसुरली शिवसेना देखील संपवतील, असा दावाही बंडखोर आमदारांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.