न्यायमूर्तीच आरोपीला भेटले; निकालाआधी उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, अपात्रतेबद्दल व्यक्त केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 01:35 PM2024-01-09T13:35:28+5:302024-01-09T13:38:21+5:30
आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
Shivsena Uddhav Thackeray ( Marathi News ) : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाल्यानंतर उद्या अंतिम निकाल दिला जाणार आहे. मात्र या निकालापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीचा आधार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. "न्यायमूर्तीच आरोपीला भेटले, असा हा प्रकार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही अपत्रातेचा खटला दाखल केला आहे आणि असं असताना राहुल नार्वेकर दोनदा त्यांना जाऊन भेटले आहेत. अशा स्थितीत आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करावी?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
आमदार अपात्रता प्रकरणात येणाऱ्या निकालाबाबत शंका उपस्थित करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "ज्या पद्धतीने या केसची हाताळणी सुरू आहे; त्यावरून लोकशाहीचा खून होतोय की काय, अशी चिन्ह दिसत आहेत. आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं आहोत. आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल आपल्या देशातली लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवेल."
"जुलमी राजवटीचा अंत जनता करणार"
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. "हा कोणाचा वैयक्तिक खटला नाही. जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत हा केलाच पाहिजे, ही शिकवण देणाऱ्या रामाचं मंदिर उभं राहतंय, त्यामुळे या जुलमी राजवटीचा अंत जनता करेलच. मी सहानभूतीवर राजकारण करणारा नाही, न्यायावरती राजकारण करणारा आहे. जुलूमशहांचा नि:पात जनता करणारच. ही माझी लढाई नाही, जनतेच्या भवितव्याची लढाई आहे. रामाची शिकवण घेऊन अत्याचाराचा आणि जुलूमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, "उद्या काही वेडावाकडा निकाल आला तर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावरील निकाल देताना काय म्हटलं होतं, हे जनतेला माहिती असायला हवं," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नेते व आमदार अनिल परब यांना कोर्टाने आधी दिलेला निकालही वाचून दाखवायला सांगितला.