काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:56 PM2024-02-12T13:56:32+5:302024-02-12T13:59:49+5:30

खासदार संजय राऊत यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्याबद्दल प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

shivsena ubt Sanjay Rauts first reaction to Ashok Chavans exit from Congress | काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊत यांचा सवाल

काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊत यांचा सवाल

Sanjay Raut On Ashok Chavan ( Marathi News ) : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चव्हाण यांचा राजीनामा हा काँग्रेससोबत महाविकास आघाडीलाही धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्याबद्दल प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

"अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते. आज गेले," अशा शब्दांत संजय राऊत यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा संदर्भ देत अशोक चव्हाणही काँग्रेसवर दावा सांगणार का, अशा खोचक सवाल विचारला आहे. "एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते," असं संजय राऊत यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा देताना काय म्हटलं आहे?

गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस पक्ष एकसंध होता. मात्र आज दुपारी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांना पत्र लिहीत अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, "मी दिनांक १२-०२-२०१४ मध्यान्हपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करत आहे."

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आमदारकीच्या राजीनाम्याबाबतची माहिती आपल्या अधिकृत एक्स हँडलवरही शेअर केली आहे. "आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे," असं ते म्हणाले.

Web Title: shivsena ubt Sanjay Rauts first reaction to Ashok Chavans exit from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.