काँग्रेसला दे धक्का... माजी मंत्र्यांचा भाजपात प्रवेश; तर रश्मी बागलांनीही सोडली ठाकरेंची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:30 AM2024-02-28T08:30:28+5:302024-02-28T08:35:31+5:30
रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी मंगळवारी दुपारी समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला.
मुंबई - काँग्रेस आणि शिवसेनेला सोठचिठ्ठी देण्याची मालिका सुरूच असून अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी एका काँग्रेस नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला आहे. तर, शिवसेना ठाकरे गटातील करमाळ्याच्या महिला नेत्या रश्मी बागल यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले.
रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी मंगळवारी दुपारी समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, सायंकाळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रश्मी बागल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. तर, धाराशिवमधील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही संध्याकाळी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात भाजपाने लोकसभा निवडणुकांपूर्वीच आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व औसा तालुक्यात बसवराज पाटील यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे, पाटील यांना पक्षात घेत भाजपाने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारासाठी बेरजेचं राजकारण केल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे करमाळ्यातून रश्मी बागल यांना भाजपात प्रवेश देऊन तेथेही आपली ताकद वाढवली आहे. रश्मी बागल यांनी २०१९ च्या निवडणुकांवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, शिवसेनेत ठाकरे व शिंदे असे दोन गट पडल्यानंतर त्यांनी आता थेट भाजपात प्रवेश केला आहे.
LIVE |📍मुंबई | पक्षप्रवेश कार्यक्रम https://t.co/XuxV9HOcA5
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 27, 2024
निवडीनंतर रश्मी बागल म्हणाल्या
निवडीनंतर बोलताना रश्मी बागल यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले भाजपाचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबूत करण्याकरिता प्रदेश महिला मोर्चाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेळ देऊन चांगल्याप्रकारे काम करु, याबद्दल मला विश्वास आहे. नव्याने दिलेली ही जबाबदारी यशस्वीतेने पार पाडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यावेळच्या परिस्थितीत मातोश्रीवर वजन असलेले शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापून करून रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे, आता रश्मी बागल शिंदे गटात जातील अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी भाजपात प्रवेश केला.