मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना एकटं पाडणार?; काँग्रेस स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:41 AM2023-02-23T10:41:10+5:302023-02-23T10:41:52+5:30
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मुंबई महापालिका निर्माण झाल्यापासून सगळ्या जागा लढणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. आम्ही आघाडीची सरकारे केली. पंधरा वर्षे आम्ही सत्तेत होतो.
सचिन लुंगसे
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, आता काँग्रेसनेदेखील सिंहावलोकन करत उमेदवारांची प्रभागनिहाय चाचपणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गटातल्या कुरापती वाढत असतानाच दुसरीकडे महापालिकेत २२७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे म्हणत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. परिणामी यंदाच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची युती कोणत्याच राजकीय पक्षाबरोबर होणार नाही; हे निश्चित झाले असले तरी केंद्रीय पातळीवर वरिष्ठांकडून घेण्यात येणारा निर्णय सर्वोच्च स्थानी राहणार आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मुंबई महापालिका निर्माण झाल्यापासून सगळ्या जागा लढणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. आम्ही आघाडीची सरकारे केली. पंधरा वर्षे आम्ही सत्तेत होतो. २००७ मध्ये सर्वात जास्त जागा आमच्या होत्या. ७४ जागा आमच्याकडे होत्या. गुरुदास कामत तेव्हा अध्यक्ष होते. २०१२ मध्ये एकत्र लढल्यानंतर ७४ वरून आम्ही ५८ वर आलो. राष्ट्रवादीकडे ८ जागा होत्या; त्यांना १४ जागा मिळाल्या. त्यांचा फायदा झाला. आमचा फायदा झाला नाही. माझी भूमिका पहिल्यापासून एकच आहे ती म्हणजे महापालिका आम्हाला स्वबळावर लढायची आहे. मात्र आमचे वरिष्ठ जे ठरवतील ते आम्हाला बंधनकारक आहे.
राहुल गांधी यांनी काय विचारले?
२२७ एकटे का लढणार? याचे कारण आमचे नेते राहुल गांधी यांनी विचारले, असे जगताप यांनी सांगितले. यावर भाई यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, 'माझा जो २२७ वा उमेदवार आहे त्यालादेखील यापूर्वी ६०० हून अधिक मते मिळाली. तो देखील पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन लढतो आहे. त्यामुळे त्याची मेहनत आहे आणि ती मेहनतही दिसत आहे. आणि त्यामुळे आम्हाला यश येईल. दरम्यान, निवडणुका कधी लागणार ? हे मात्र नरेंद्र आणि देवेंद्र हेच सांगू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
हात से हात जोडो
२२७ जिंकणार असा दावा आम्ही कधीच केला नाही. पण काँग्रेसचा कार्यकर्ता लढतो आहे. त्याचे काम आहे. हात से हात जोडो अभियानाला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. अध्यक्ष म्हणून मला माझ्या कार्यकर्त्यांची बाजू धरायची आहे. - भाई जगताप, अध्यक्ष, मुंबई, काँग्रेस
कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार
निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार होत आहे.
मुंबईकरांना पाणी मोफत मिळाले पाहिजे.
झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे; मुंबई झोपडपट्टीमुक्त झाली पाहिजे.
मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ झाले पाहिजे.
मराठी शाळा वाचल्या पाहिजेत.