आता काय पवार फॅमिलीचे अॅफिडेव्हिट करून देऊ का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 05:34 PM2019-09-28T17:34:01+5:302019-09-28T17:34:38+5:30
पवार कुटुंबामध्ये कौटुंबिक कलह असल्याची माध्यमांमध्ये चर्चा नेहमी होत असते. यावर कालच शरद पवार यांनी त्यांची भुमिका मांडली होती.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनाम्यावरून त्यांची भुमिका आज पत्रकार परिषदेत मांडली. यामध्ये त्यांनी 11.5 हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला, हे तुम्हाला पटते का, असा सवाल त्यांनी केला. तसेच कौटुंबिक वादावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, तरीही प्रसारमाध्यमांनी त्यांना लिफ्टमध्ये गाठत कलहावरून प्रश्नांचा भडीमार केला.
पवार कुटुंबामध्ये कौटुंबिक कलह असल्याची माध्यमांमध्ये चर्चा नेहमी होत असते. यावर कालच शरद पवार यांनी त्यांची भुमिका मांडली होती. आमच्यामध्ये कौटुंबिक वाद नाहीत. आमच्या घरामध्ये कुटुंबप्रमुखाचे ऐकण्याचे संस्कार आहेत. आम्ही दर दिवाळीला एकत्र जमून पुढील दिशा ठरवतो. माझे बंधू वारल्यामुळे सध्या मीच मोठा आहे. यामुळे माझा निर्णय हा अंतिम असतो, असा खुलासा शरद पवार यांनी कौटुंबिक कलहाच्या प्रश्नावर केला होता. तरीही आज अजित पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला.
यावर अजित पवारांनी मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हाही आमच्यात कलह असल्याची चर्चा केली गेली. शरद पवार आणि अजितदादा यांचे दोन गट असल्याचे बोलले गेले. सुप्रिया राजकारणात आली तेव्हाही हेच घडले आणि आताही तेच. पवार कुटुंब मोठा परिवार आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत तेव्हा हे कृपया थांबवा असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. मात्र एवढ्यावरच न थांबता प्रसारमाध्यमांनी त्यांना लिफ्टमध्ये गाठले आणि पुन्हा कलहावर प्रश्न उपस्थित केला.
यावर अजित पवारांनी संयम ठेवत, काल पवारसाहेबांनी सांगितलं, आज मी सांगितलं. आता काय, तुम्हाला पवार फॅमिलीचं अॅफिडिव्हीट करुन देऊ का, असे म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना गप्प केले.