गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांत झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:03 AM2018-09-10T05:03:28+5:302018-09-10T05:03:45+5:30
गणेशचतुर्थी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी भाविकांनी रविवारी जवळपासच्या बाजारपेठा गाठल्या.
मुंबई : गणेशचतुर्थी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी भाविकांनी रविवारी जवळपासच्या बाजारपेठा गाठल्या. कंठी, मुकुटापासून लाडू, पेढ्यांच्या खरेदीसाठी दादर, तसेच लालबागची बाजारपेठ भक्तगणांनी फुलली होती. मोठ्या संख्येने भाविक खरेदीसाठी घराबाहेर पडल्यामुळे शहरातील काही रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती.
महिनाभर आधीच बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू होते. त्यामुळे श्रींच्या कंठी-माळांपासून, आरास, सजावटीच्या खरेदीसाठी रोजच बाजारपेठांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लोकांची गर्दी दिसून येतेच, पण गणेशाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने विसरलेल्या, राहिलेल्या वस्तूंची यादी घेऊन स्टॉलवर स्टॉल पालथे घालणारे भाविक दादर, गिरगाव, लालबागच्या बाजारपेठांमध्ये दिसत होते. बाप्पांसाठी मखर, चौरंग, अलंकार, गृहसजावटीच्या वस्तू, पाहुण्यांना फराळ देण्यासाठी प्लेट्स-ग्लास, नैवेद्याचे साहित्य, रांगोळ्यांची खरेदी जोरात सुरू होती. शहर-उपनगरांतील बाजारपेठांमध्येही हेच चित्र होते.
>चाकरमान्यांची
घाई शिगेला
निरंजन, समया, नैवेद्याची आणि आरतीची सजविलेली तबके, दीपमाळा अशा वस्तूंची खरेदीही निरखून-पारखून केली जात होती. अनेक सराफांकडेही बाप्पासाठी सुवर्णालंकार घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. दुसरीकडे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची घाईसुद्धा शिगेला पोहोचलेली दिसून आली. जाता-जाता गावाकडच्या नातेवाइकांसाठी कपडे खरेदी करण्यापासून ते लाडू-चिवडा घेण्यापर्यंत अनेक कामे एकाच दिवसात करायची असल्यामुळे त्यांची धांदल उडालेली दिसत होती.