सांगली पूर: राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने पूरस्थिती गंभीर: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:39 PM2019-08-08T16:39:10+5:302019-08-08T16:45:04+5:30

राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत.

The situation is serious due to neglect by the state and central government: Balasaheb Thorat | सांगली पूर: राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने पूरस्थिती गंभीर: बाळासाहेब थोरात

सांगली पूर: राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने पूरस्थिती गंभीर: बाळासाहेब थोरात

Next

मुंबई: राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे व केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला चार हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना केली.

तसेच गेल्या पाच सहा दिवसांपासून राज्यात भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यांमधील लाखो लोक पूरामुळे बेघर झाले आहेत. लाखो लोक पूराच्या पाण्यामध्ये अडकून पडले आहेत, त्यांना मदतीची गरज आहे. पण महाजनादेश यात्रेच्या जल्लोषात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पूरग्रस्तांचा व्यथा पोहोचू शकल्या नाहीत हे दुर्देव आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना चार पाच दिवस पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेही नाहीत. या सरकारमध्ये पालकमंत्री फक्त ध्वजारोहण करण्यासाठीच नेमले आहेत का? असा संतप्त सवाल आ. थोरात यांनी केला.

राज्य आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे. महाराष्ट्रावर एवढे मोठे संकट आले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप निवडणूक विजयातच मश्गुल आहेत. एरव्ही प्रत्येक गोष्टीवर ट्वीट करणा-या पंतप्रधानांनी राज्यातील पूरस्थितीची अद्याप साधी दखलही घेतली नाही. आज बचावकार्य करणारी एक बोट उलटल्यामुळे जवळपास १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पूर ओसरल्यावर रोगराई पसरण्याची भीती आहे त्यावेळी परिस्थिती अजून गंभीर होईल. मदत आणि बचावकार्याला वेग देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी आम्ही केली आहे. 

त्याचप्रमाणे अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास उशीर झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने कर्नाटक सरकारच्या संपर्कात राहून पाणी सोडण्याचे नियोजन केले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आमदार व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहेत, पण भाजपचे लोकप्रतिनिधी मात्र कोठेही दिसत नाहीत. त्याचसोबत जनतेची गरज फक्त मतांपुरतीच असल्याचा आरोप त्यांनी भाजपावर लगावला. तसेच मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन सरकारने लोकांच्या जीवाची पर्वा करावी असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The situation is serious due to neglect by the state and central government: Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.