... तर चांगल राजकारण करता येईल, रोहित पवारांचा पार्थला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 10:11 PM2019-10-01T22:11:22+5:302019-10-01T22:11:36+5:30
पार्थ राजकारणात आहेच, फक्त त्याने लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे अन् लोकांनी त्याला विश्वासात घेतलं पाहिजे.
मुंबई - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. मात्र, यावर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारराजकारण सोडून शेती करण्याच्या विचारात आहेत, त्यांनी मुलांनाही शेती करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती दिली. दादापुत्र पार्थ पवार यांना खासदार करण्यासाठी जीवाचे रान करणारे अजित पवार हा सल्ला कसा देऊ शकतात, याबाबत राजकीय पटलावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांनी आपल्या विधानावर घुमजाव करताना मी गेल्या 30 वर्षातील राजकारण जवळून अनुभवलं आहे. त्यामुळे अस्वस्थ झाल्याच्या भावनेतूनच पार्थला हा सल्ला दिल्याचं म्हटलं होतं. त्याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारला असता, पार्थच्या बाबतीत अजित पवार काळजीत असल्यामुळे तसं वक्तव्य करुन गेले. पार्थ स्वत: राजकारणात आल्यास, त्यांच्याबाबत अजित दादांचा निर्णय योग्यच असेल. पार्थला राजकारणात राहायचं असेल, कष्ट घ्यायचं असेल, लोकांमध्ये जायचं असेल, तर तो 100 टक्के हे करू शकतो.
राजकारणात येण्याचा हक्क सर्वांना आहे, त्यासाठी त्या कुटुंबात असलं काय अन् नसलं काय? असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
पार्थ राजकारणात आहेच, फक्त त्याने लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे अन् लोकांनी त्याला विश्वासात घेतलं पाहिजे. तरच, येत्या काळात चांगलं राजकारण करता येईल, असा सल्लाच रोहित पवार यांनी पार्थ पवारांना दिला आहे. लोकसभा निवडणुकांवेळी पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, पार्थ यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. आता, शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे रोहित यांनी मंत्री राम शिंदेंचं आव्हान स्विकारलं असून ते जोमाने प्रचार करताना दिसतात.