... म्हणून हे सरकार 5 वर्षे टिकणार, राऊतांनी सांगितलं 'पवार'फुल्ल राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 08:37 AM2019-12-15T08:37:21+5:302019-12-15T08:38:15+5:30
भाजपाकडून नेहमीच हे तीनचाकी ऑटो रिक्षावालं सरकार जास्त काळ चालणार नाही
मुंबई - काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यामुळे नेहमीच शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. त्यात, शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून सावरकरांना लक्ष्य केले. त्यामुळे, आता शिवसेनेची भूमिका काय असा प्रश्न सर्वांनाचा पडला होता. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडत सावरकर हे तेज, त्याग, तत्व आणि तपाचे प्रतिक असल्याचं म्हटलं. तसेच, कुणीही सावरकरांचा अवमान करू नये, असे आवाहनही शिवसेनेने केले आहे.
भाजपाकडून नेहमीच हे तीनचाकी ऑटो रिक्षावालं सरकार जास्त काळ चालणार नाही, अशी टीका केली जाते. विशेष म्हणजे अजित पवारांवर भाजपला आशा आहे. मात्र, संजय राऊत यांनी हे सरकार 5 वर्षे चालेल, असे स्पष्ट केलंय. सामनाच्या रोखठोक या सदरात राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षे चालेल, कारण सरकार चालविणाऱ्या प्रमुख नेत्यांकडे दिलदारी आहे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मी शरद पवारांना याबाबत प्रश्न केला होता. अजित पवारांचं काय? त्यावर पवारांनी माझ्या मनातील शंका कायमची दूर केली. पवार विश्वासाने म्हणाले, अजित पवारांची चिंता करु नका. हे सरकार 5 वर्षे तेच टिकवतील. निश्चिंत राहा!. शरद पवार निश्चिंत आहेत, तोपर्यंत सरकार स्थिर आहे. महाराष्ट्र निश्चिंत आहे. हे सरकार टिकवायचेच या एका निर्धाराने शरद पवार उभे आहेत. त्यामुळे, काळजी नसावी! असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मतभेद होऊन हे सरकार कोसळावे यासाठी भाजपाकडून प्रयत्न होत आहेत. कधी राष्ट्रवादीला सोबत घेणाऱ्या भाजपला अजित पवारांकडून आशा आहे, तर कधी शिवसेनेसाठी दरवाजे खुले आहेत, असं म्हणत पुन्हा एकत्र येण्याचं आमंत्रण देण्यात येत आहे. तर, कधी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विसंगत विचारसरणीवरुन शिवसेनेला लक्ष्य केलं जातंय. जसं, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील तापले. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेससह सहभागी असलेल्या शिवसेनेने या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्याने भाजपमधील नाराजी आणखी वाढली. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.