...म्हणून सरकार ५ वर्ष चालेल; शरद पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधील फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:23 AM2020-02-22T11:23:49+5:302020-02-22T11:28:35+5:30
Sharad Pawar: काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काय फरक आहे असं विचारल्यानंतर काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या निर्णयासाठी दिल्लीला जावं लागतं.
मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार किती दिवस चालेल याबाबत अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. मात्र हे सरकार ५ वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र-माझा व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार ५ वर्ष सरकार चालेल, सरकारचं नेतृत्व करण्याची व्यक्ती कशी आहे तिचा स्वभाव कसा यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, सध्या ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांचा स्वभाव असा आहे की, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया, ज्यांना जे काम दिलं आहे ते त्यांनी करावं, त्यात हस्तक्षेप करत नाही, हे सरकार संमिश्र आहे त्यामुळे किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला, त्यानुसार काम सुरु असल्याने आणि हस्तक्षेप करण्याची भूमिका नसल्याने कटुता, नाराजी झाली नाही. मी ८८ च्या दशकात किती पक्षाचं सरकार चालवलं हे सगळ्यांना माहित आहे अशा शब्दात पवारांनी उद्धव ठाकरेंच्या स्वभावाबद्दल भाष्य केलं आहे.
तर काही गोष्टी शिकायच्या असतात बाहेर उघड करायच्या नसतात, शिवसेना म्हणून आमचा कधीही संपर्क आला नाही, बाळासाहेबांशी मित्र म्हणून संबंध आला, बाळासाहेबांमध्ये एक सभ्यता होती, आम्ही दोघे जाहीर सभेतून एकमेकांबद्दल बोलायचो मात्र जाहीर सभानंतर आम्ही एकत्र आलो की सुसंवाद चालायचा. बाळासाहेबांनी भाषणात बोलले शब्द कधीही मागे घेतले नाहीत, बाळासाहेबांचा निर्णय ठाम असायचा असं शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दल बोलताना सांगितले.
त्याचसोबत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काय फरक आहे असं विचारल्यानंतर काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या निर्णयासाठी दिल्लीला जावं लागतं, केंद्रीय सत्ता आणि नेतृत्वाची विकेंद्रीकरण असल्याने अनेकदा अडचण येते, काँग्रेसने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत बदल केल्याचं दिसून येतं. हे सरकार चालवायचं ही भूमिका काँग्रेसने घेतल्याचं दिसतं, आता उद्धव ठाकरे आमच्यात रमले आहेत. असं शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, फडणवीस सरकारचे निर्णय बदलण्याबाबत शरद पवार म्हणाले की, आंध्र प्रदेशात पाहिलं असेल, जुन्या सरकारचे निर्णय बदलले की त्यातून चुकीचा संदेश लोकांमध्ये जातो, उद्योगधंद्यामध्ये फरक पडतो पण महाराष्ट्रात जुन्या सरकारचे निर्णय बदलले पण त्याचा परिणाम राज्याच्या हितावर होईल असं नाही असं सांगत त्यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयांची पाठराखण केली आहे.