... म्हणून 'सारथी'च्या बैठकीत मी खाली होतो, संभाजीराजेंनीच सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:53 PM2020-07-09T13:53:45+5:302020-07-09T13:55:55+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे.
मुंबई - मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला. मात्र, संभाजीराजे यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळत सामंजस्याची भूमिका घेतली. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे बैठकीत झालेला गोंधळ मिटला. या बैठकीनंतर व्यासपीठावर न बसण्याबाबत स्वत: संभाजीराजेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राज्य सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी गोंधळ घातला. छत्रपतींनी तिसऱ्या रांगेत स्थान दिलं जात असेल तर आम्ही बाहेर काय तोंड दाखवणार, असा प्रश्न मराठा समाजाच्या समन्वयकांनी उपस्थित केला. त्यामुळे बैठकस्थळी गोंधळ झाला. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेतली.
'मी इथे केवळ एक सदस्य म्हणून आलो आहे. त्यामुळे मान-अपमान महत्त्वाचा नाही. तर सारथी महत्त्वाची आहे,' अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी समन्वयकांची समजूत काढली. मी इथे समाज म्हणून उपस्थिती लावली आहे, मला सत्ताधारी समन्वयक आणि मंत्र्यांशी संवाद साधायचा आहे. त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करायची आहेत. मी विचारपीठावर बसलो तर वेगळा संदेश बाहेर जाईल, म्हणून स्वच्छेनं सोशल डिस्टन्सिंग पाळत मी खाली बसलो होतो, असे स्पष्टीकरणच संभाजीराजेंनी दिले.
संभाजीराजे छत्रपती यांनी दाखवलेलं सामंजस्य आणि अजित पवारांच्या मध्यस्थीमुळे सभागृहातील तणाव कमी झाला. यानंतर बैठक पार पाडली. सध्याच्या घडीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात दुसरी बैठक सुरू आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत नेमके काय निर्णय होणार, याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. सारथी संस्था आधीसारखीच चालवली जावी, संस्थेसाठी भरीव तरतूद करण्यात यावी, निधीत गैरव्यवहार केलेल्यांना तुरुंगात टाकावं, अशा मागण्या मराठा समाजाकडून करण्यात येत आहेत.