'शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का ते बघावं'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 11:30 AM2019-07-28T11:30:38+5:302019-07-28T11:39:23+5:30
विरोधी पक्षातील अनेक लोक भाजपात येण्यासाठी उत्सुक आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांना फोन केला हे पवारांनी सांगावे.
मुंबई - मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाला रामराम करून भाजपात प्रवेश घेताना पाहायला मिळत आहे यावरून पवारांनी भाजपावर टीका करत नेत्यांवर चौकशीचे दबाव आणून पक्ष बदल करण्यास भाग पाडत आहेत असा आरोप केला. त्यावर गिरीश महाजनांनी शरद पवारांना इशारा देत काँग्रेस-राष्ट्रवादीत 50 पेक्षा अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. आपल्या पक्षातून लोक का जात आहेत याची आत्मपरीक्षण करावं असं महाजनांनी सांगितले आहे.
पवारांच्या आरोपावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, त्याचं खापर भाजपावर फोडलं जात आहे. ईडी, एसीबी यांची नियमित चौकशी सुरु आहेत त्यांच्या चौकशीत कुठेही मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही त्यामुळे पवारांनी केलेले आरोप हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी केले जात आहेत असा आरोप महाजनांनी केला.
कर्नाटकनंतर राजस्थान अन् मध्य प्रदेश सरकारं अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न- शरद पवार https://t.co/OOQyeGo3FF
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2019
तसेच आपल्या पक्षातून लोक का जातायेत याचं आत्मपरीक्षण करावं. आम्ही पक्ष वाढवतो आहे, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन नवीन नेते, नवीन कार्यकर्ते आमच्याकडे येतात, काँग्रेस-राष्ट्रवादीत ज्यांना भविष्य दिसत नाही म्हणून ते पक्ष बदलत आहेत. आगामी काळात पवारांच्या बाजूने एक आकडी संख्या असणारे लोकही राहतायेत का याकडे त्यांनी बघावं असं गिरीश महाजनांनी सांगितले.
दरम्यान विरोधी पक्षातील अनेक लोक भाजपात येण्यासाठी उत्सुक आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांना फोन केला हे पवारांनी सांगावे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 पेक्षा अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्यांची नावं पवारांनी घेतली ती का घेतली? असेच अनेक संपर्कात आहेत. घराणेशाहीला लोक कंटाळली आहे. पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आपण कुठे चुकतं हे बघावं. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीवर आली आहे. नवीन पिढीही त्यांच्याकडे जायला तयार नाही. तर येत्या आठवडाभरात अनेक पक्षप्रवेश होतील असा दावा गिरीश महाजनांनी केला आहे.
गिरीश महाजनांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाकडून लोकांची दिशाभूल करण्यासाठी अनेकांची नावं पसरविली जात आहेत. लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम भाजपा करतंय, दुसरा पक्ष फोडून आपला पक्ष वाढविणे ही संस्कृती भाजपाने आणली आहे तिला लोक धडा शिकवतील. वावड्या उठविण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला.