काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:38 PM2024-06-10T18:38:25+5:302024-06-10T18:39:42+5:30
Jayant Patil : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे, पक्षातील दोन्ही गट वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहेत.
Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका संपल्या, केंद्रात एनडीए'ने सरकार स्थापन केले. दरम्यान, आता ऑक्टोंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे, दोन्ही गटांनी वर्धापन दिन साजरा केला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, आता 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
लोकसभा निवडणुकीत 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. राज्यात १० जागांपैकी ८ जागा निवडून आणल्या आहेत, तर अजितदादा यांच्या पक्षाने राज्यात ४ जागा लढवल्या यातील एका जागेवर विजय मिळवला, तर बाकीच्या तीन जागांवर पराभव झाला. यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेते, आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता याबाबत आमदार जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. तसेच केंद्रीय मंडळातील मंत्रिपद वाटपावरूनही पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
"नजिकच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणती आणि नकली कोणती हा वाद जो मोदी साहेबांनी केला होता. आता मोदींनाही यातून उत्तर मिळाले आहे की, असली राष्ट्रवादी शरद पवार यांची आहे. आता काल ७२ जागांमध्ये मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली नाही. आता आणखी नऊ जागा आहेत. यात संधी मिळेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांना लगावला.
जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य
"ज्याच्या हातात छडी त्यांच्यामागे आम्ही आहोत, अशी मानसिकता गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून अनेकजण अडचणीत आहेत. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत ते आमच्याकडे येणारच आहेत. त्यांना आम्ही योग्यवेळीच वाट पाहायला सांगितलं आहे, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिला, यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणते आमदार परत येणार या चर्चा सुरू आहेत.
"लोकशभेत आणखी एक जागा आमची आली असती. साताऱ्याची जागा आली असती, पिपाणी या चिन्हाला ३४ हजार मतं मिळाली, यामुळे आमची जागा गेली, असंही जयंत पाटील म्हणाले.