सोनिया गांधीही महाराष्ट्रात, भारत जोडो यात्रेच्या मंचावर शरद पवार, उद्धव ठाकरे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:05 PM2022-11-15T12:05:39+5:302022-11-15T12:12:36+5:30
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून सोनिया गांधी महाराष्ट्रात येणार आहेत.
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन ८ दिवस झाले आहेत. महाराष्ट्रात या यात्रेला काँग्रेस समर्थक आणि तरुणाईंचा चांगला प्रतिसाद मिळत असून राहुल गांधींच्या नांदेडमधील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती लावली होती. तर, आदित्य ठाकरेही राहुल गांधींसोबत पायी चालताना दिसून आले. आता, राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या जाहीर सभेसाठी सोनिया गांधी महाराष्ट्रात येणार असून या सभेत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून सोनिया गांधी महाराष्ट्रात येणार आहेत. शेगाव येथील जाहीर सभेसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली. १८ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे ही जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे, या सभेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर आल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळेल. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी भक्कम असल्याचा संदेशही या मंचावरुन जाऊ शकतो.
दरम्यान, यापूर्वी कर्नाटकमध्ये यात्रा असताना, सोनिया गांधी यात्रेत काहीवेळासाठी चालत असल्याचं आपण पाहिलं. आता, प्रथमच त्या जाहीर सभेसाठी भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. तर, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भारत जोडो यात्रेत एकत्र आल्यास भाजपसमोर विरोधकांचे मोठे शक्तीप्रदर्शन ठरणार आहे. त्यातून राज्यात काँग्रेसला ताकद देऊन, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल.
राहुल गांधींची यात्रेचं विदर्भात स्वागत, पैनगंगेच्या तिरावर
मराठवाड्यातील फाळेगाव येथून सुरू झालेली यात्रा आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील कनेरगाव नाक्याच्या पुलावर पोहोचली. यात्रा कनेरगावच्या पुलावर येण्यापूर्वी पैनगंगेच्या नदीपात्रात पाच हजार फुगे सोडून तिरंग्याचा देखावा साकारण्यात आला होता. पूल ओलांडल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रवंदना झाली. त्यानंतर एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नागेश करिआप्पा, प्रदेश पदाधिकारी अकांक्षा ठाकूर यांच्यावतीने १०० जणांच्या ढोल-पथकाच्या गजरात लाल किल्ल्याच्या दरवाजाच्या प्रतिकृतीतून राहुल गांधींचे स्वागत केले. तर, रस्त्यावर फुले अंथरुन, बंजारा नृत्याने भारत जोडोची घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या यात्रेचं वेल कम आणि गुड मॉर्निंग करण्यात आलं.