"हे म्हणजे शिळ्या कडीला उत"; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 02:19 PM2023-09-19T14:19:32+5:302023-09-19T15:07:03+5:30
शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं. आता, सुप्रिया सुळेंनीही थेट संसदेतून अजित पवारांची कोंडी केल्याचं दिसून येत आहे
मुंबई - पंतप्रधान नरेद्र मोदींकडून काँग्रेस व राष्ट्रवादीवर भ्रष्टाचार व घराणेशाहीचा आरोप होत असल्याचा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी थेट मोदींना चॅलेंजच दिलं होतं. आता, खासदार सुप्रिया सुळे यांनीही संसदेतील विशेष अधिवेशनात भाषण करताना शरद पवारांची री ओढली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसने जर भ्रष्टाचार केला असेल, तर सखोल चौकशी करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी एकप्रकारे अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन, आता अजित पवार गटानेही पलटवार केला आहे.
शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं. आता, सुप्रिया सुळेंनीही थेट संसदेतून अजित पवारांची कोंडी केल्याचं दिसून येत आहे. कारण, मोदींनी भाषणात उल्लेख करताना सहकार आणि इरिगेशनचा उल्लेख केला. त्यावेळी, हे दोन्ही खात्याचा कारभार अजित पवार यांच्याकडेच होता. त्यामुळे, राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर, आता महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलंय.
राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून गेल्या एक-दीड महिन्यांमध्येच वाढत असलेली काही आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी पाहून आश्चर्य वाटतं. मुळात हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे, असे म्हणत अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे.
बरं आम्ही कोणाला खरं समजायचं?? कुणाच्या आठवणीने उमाळा दाटून येणारी व्यक्ती खरी की त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती खरी??2/2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 19, 2023
बरं आम्ही कोणाला खरं समजायचं? कुणाच्या आठवणीने उमाळा दाटून येणारी व्यक्ती खरी की त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती खरी, असा सवाल करत नाव न घेता सुप्रिया सुळेंना चाकणकरांनी लक्ष्य केलंय.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे
संसंदेतील भाषणात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात आल्यानंतर भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी, एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता इरिगेशन घोटाळा, बँक घोटाळ्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं होतं. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की, पंतप्रधानांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी, आमचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे. केवळ दोनच नाही, तर आणखी ४ जसं एपीएमसी वगैरे अशा घोटाळ्यांचेही आरोप आहेत. इथं नात्याचा मुद्दा नाही. कारण, संसदेत माझे ८०० भाऊ आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं नाव न घेता संसदेत जोरदार भाषण केलं. भ्रष्टाचाराविरुद्ध पंतप्रधानांना जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते सर्व नेते आता भाजपामध्ये आहेत. महाराष्ट्रासह इतरही राज्यात तीच परिस्थिती आहे. त्यामुळे, आपण या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करावी, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी संसदेतील भाषण गाजवलं.