'महामानवांच्या विचारांवर राज्य कारभार करणार', कॅबिनेटसाठी अजित पवार मंत्रालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 12:37 PM2023-07-04T12:37:33+5:302023-07-04T12:58:42+5:30

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला हजर राहत आहेत. 

State administration will be done on the thought of the great man, Ajit Pawar in the ministry for the cabinet | 'महामानवांच्या विचारांवर राज्य कारभार करणार', कॅबिनेटसाठी अजित पवार मंत्रालयात

'महामानवांच्या विचारांवर राज्य कारभार करणार', कॅबिनेटसाठी अजित पवार मंत्रालयात

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर, आता राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आपल्या पाठिशी आहेत असा दावा अजित पवारांकडून केला जात आहे. तर ९ आमदार वगळता बाकीचे शरद पवारांच्या सोबत असल्याचे राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यात दोन्ही गटाकडून येत्या ५ जुलैला मुंबईत बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, अजित पवारांसह राष्ट्रवादीचे मंत्री आज मंत्रालयात पोहोचले आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला हजर राहत आहेत. 

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी सर्वप्रथम मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतीमेस पुष अर्पण करून अभिवादन केले. तसेच या महामानवांच्या विचारांवर राज्यकारभार करण्याचा दृढनिर्धार केला. त्यावेळी, त्यांच्यासोबत सहकारी मंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अदितीताई तटकरे, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अनिल भाईदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीला आज नव्याने मंत्री झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री हजर राहणार आहेत. त्यासाठी, अजित पवारांच्या नेतृत्त्वात हे सर्वच मंत्री मंत्रालयात आल्याचे पाहायला मिळालं.

दरम्यान, शरद पवार समर्थक आमदार आणि जयंत पाटील यांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांसोबत असल्याचे कालपर्यंत सांगण्यात येत होते. परंतु आज सकाळी तनपुरे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने आता प्राजक्त तनपुरे अजित पवारांच्या गळाला लागलेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. इंदापूरचे आमदार दत्ता भरणे हेदेखील देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या भेटीला आले होते. आज सकाळपासून अनेकजण अजित पवारांची भेट घेत आहेत.

Web Title: State administration will be done on the thought of the great man, Ajit Pawar in the ministry for the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.