४.६३ कोटी की २.७९ कोटी?... ठाकरे सरकारच्या शपथविधीवर नेमका खर्च किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 02:01 PM2020-02-12T14:01:27+5:302020-02-12T14:06:56+5:30
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांसाठी शिवाजी पार्क येथे शपथविधी कार्यक्रम झाला होता.
मुंबई - महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या शपथविधीवर किती खर्च करण्यात आला आहे? याची अचूक माहिती देण्यात राज्य शासन अपयशी ठरले असून याबाबतीत सादर करण्यात आलेल्या माहिती अधिकार अर्जाच्या वेगवेगळया माहितीत तफावत आढळून आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांसाठी शिवाजी पार्क येथे शपथविधी कार्यक्रम झाला होता. याबाबतीत एकूण किती खर्च झाला? हे जाणून घेण्यासाठी असंख्य अर्ज सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागाकडे दाखल झाले पण दुदैर्वाने कोणासही अचूक माहिती आणि आकडेवारी देण्यात आली नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना पाठविलेल्या माहितीत कक्ष अधिकारी रा.रो.गायकवाड यांनी एकूण खर्च 2 कोटी 79 लाख झाल्याचे कळविले आहे तर प्रथम अपील सुनावणीनंतर अजय बोस यांस एकूण खर्च 4 कोटी 63 लाख झाल्याची माहिती कळविली आहे. या आकडेवारीत मोठी तफावत आहे. संपूर्ण माहिती नसतानाही अर्धवट माहिती देण्यात जन माहिती अधिकारी यांना काय स्वारस्य आहे? असे गलगली यांचे म्हणणे आहे.
शपथविधीवर झालेला खर्च हा जनतेच्या तिजोरीतुन झालेला असून या बाबत अचूक आणि खरी आकडेवारी शासनाने माहिती अधिकार कायदा अधिनियम 2005 चे कलम 4 अंतर्गत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच माहितीमधील तफावत लक्षात घेता कोणी जाणूनबुजून माहीती तसेच खर्चाची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न तर नाही याची चौकशी करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.