"हिंसाचार, जाळपोळ थांबवा, शासन चर्चेला तयार"; अजित पवारांचे आंदोलकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:14 PM2023-09-02T16:14:07+5:302023-09-02T16:16:52+5:30

राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे

"Stop violence, arson, government ready for talks"; Ajit Pawar's appeal to the protesters | "हिंसाचार, जाळपोळ थांबवा, शासन चर्चेला तयार"; अजित पवारांचे आंदोलकांना आवाहन

"हिंसाचार, जाळपोळ थांबवा, शासन चर्चेला तयार"; अजित पवारांचे आंदोलकांना आवाहन

googlenewsNext

मुंबई - "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. तसेच, मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी मराठा समाज बांधवांना, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्या, बांधवांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.  

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तात्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राहिल, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करुया, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले. 
 

Web Title: "Stop violence, arson, government ready for talks"; Ajit Pawar's appeal to the protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.