...तर धर्मादाय रुग्णालयांवर होणार कडक कारवाई; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:57 AM2023-03-26T07:57:50+5:302023-03-26T07:57:59+5:30
राज्यातील धर्मादाय रुग्णालयात दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे.
मुंबई : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांकडून दुर्बल घटकातील रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा झाला आणि त्याबाबत तक्रार आली तर तो विधानसभेचा अवमान समजला जाईल, असा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. राज्यातील काही धर्मादाय रुग्णालयात दुर्बल घटकातील रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी २१ मार्च रोजी एक बैठक घेतली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शनिवारी विधानसभेत दिली.
राज्यातील धर्मादाय रुग्णालयात दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. मात्र काही रुग्णालयात दुर्बल घटकातील रुग्ण उपचारासाठी गेले तर उपचारात हलगर्जीपणा केला जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. यासंदर्भात रुग्णांकडून तक्रारी येत असतात, त्याचबरोबर आमदारही विधानसभेत याबाबत तक्रार करत असतात, अशी माहिती सावंत यांनी निवेदन करताना दिली.
४०० धर्मादाय रुग्णालये
राज्यात ४०० धर्मादाय रुग्णालयांकडून दुर्बल घटकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात. आता या रुग्णालयांविरोधात उपचारात हलगर्जीपणा केल्याची तक्रार झाल्यास तो सभागृहाचा अवमान समजला जाईल आणि संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई केली जाईल, असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतल्याची माहिती सावंत यांनी विधानसभेत दिली.