अंतिम वर्षाच्या वैद्यकीय पदवी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बसणे बंधनकारक- उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 02:50 AM2020-09-06T02:50:45+5:302020-09-06T06:57:10+5:30
दिलासा देण्यास नकार
मुंबई : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या वैद्यकीय पदवी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बसावे लागणार आहे. प्रत्यक्षात परीक्षा घेण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शनिवारी नकार दिला.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेगवेगळ्या शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या नऊ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. ए.ए. सय्यद व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे शनिवारी होती. २१ आॅगस्ट रोजी विद्यापीठाने परिपत्रक काढून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात परीक्षेला बसणे बंधनकारक केले. या परिपत्रकाला विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘आमच्या मते, विद्यार्थी ऐनवेळी उच्च न्यायालयात आले. त्यामुळे आम्ही परीक्षांना स्थगिती देण्याचा अंतरिम दिलासा देऊ शकत नाही,’ असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
स्थगिती देण्यास नकार देताना उच्च न्यायालयाने जेईई (मेन) आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यासंदर्भातल्या निकालाचा हवाला दिला. महामारी असली तरी आयुष्य पुढे गेले पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे करिअर फार काळ लांबणीवर टाकू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.