Supriya Sule : 'भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित दादांकडे गॅस सिलेंडरच मागणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 08:50 PM2021-11-02T20:50:46+5:302021-11-02T20:52:55+5:30
दिवाळी आणि दसऱ्यामध्ये जेवढा सिलेंडर आपल्याला लागतो तेवढा कधी लागत नाही. त्यातच, 'सिलेंडरचा भाव वाढला आहे, मी अजित पवारांना या दिवाळीत सांगणार आहे.
मुंबई - दिवाळीपूर्वीच पेट्रोल दरवाढीचा भडका झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर आता एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागला आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, बॉलिवूडचा अभिनेता केआरकेनेही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी तर चक्क यंदाच्या भाऊबीजेला भावाकडून सिलेंडरची टाकीच भेट मागणार असल्याचं म्हटलं आहे.
दिवाळी आणि दसऱ्यामध्ये जेवढा सिलेंडर आपल्याला लागतो तेवढा कधी लागत नाही. त्यातच, 'सिलेंडरचा भाव वाढला आहे, मी अजित पवारांना या दिवाळीत सांगणार आहे. आम्ही आठ बहिणींनी ठरवले आहे की, आमच्या सहा भावांनी पुढच्या सहा महिन्यांसाठी आम्हाला प्रत्येकाने फक्त एक एक सिलेंडर द्यायचा, भाऊबीज म्हणून सिलेंडरच पाहिजे,' असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दिवाळीच्या काळातच पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव वाढला आहे. आर्यनला खानला आत ठेवून सरकारला आणखी भाववाढ करायची होती काय असे मला वाटत आहे. महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे, गॅसचे दर कमी करावेत यासंदर्भात मी संसदेत मागणी करणार असल्याचेही सुप्रिया सुळेंनी सांगितले.
दरम्यान, मोदींनी दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅसच्या दरात 266 रुपयांनी वाढ केली. त्याबद्दल मी त्यांना सॅल्यूट करतो. मोदी हे हिंदू-मुस्लीम यांच्यात भेदभाव करत नाहीत, याचा हाच पुराव आहे, अशी खोचक टीका केआरकेनं केली आहे. तर, दिग्दर्शक अविनाश दास यांनी लिहिलं आहे की, ही तर शुभ दिवाळं निघालंय, असे ट्विट केलंय.
आयपी सिंह यांनीही साधला निशाणा
इंधन दरवाढीवरुन समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह म्हणाले की, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत लखनौमध्ये 937.50 एवढी झाली आहे. श्रीमंत असो किंवा गरीब आता कुणालाही सबसिडी मिळत नाही. पंतप्रधानांनी ओरडू ओरडून ग्रामीण भागात गॅस दिल्याचं सांगितलं. मात्र, आज ग्रामीण भागातील 99 टक्के जनता पारंपरिक स्त्रोतचा वापर करत आहे. त्यामध्ये, शेणाच्या गौऱ्या आणि वाळलेल्या लाकडांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं.