देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली? सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 08:35 AM2024-03-07T08:35:53+5:302024-03-07T08:40:21+5:30
दोन दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर बंगल्यावर भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
Supriya Sule ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे दोन दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सागर बंगल्यावर भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.खरच ही भेट झाली यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली का या चर्चांवर सांगताना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवसभरातील गाठी-भेटी दौऱ्याची माहिती वेळेसह सांगितली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आधी एक ठरवा मी सारंग बंगल्यावर भेटलो की सागर बंगल्यावर भेटलो. मी सोशल मीडियाचे आभार मानते. मी साडे नऊ वाजता बारामती तालुक्यातील लाटे गावामध्ये गेले होते, तेव्हा तेथील मंदिरात माझा चश्मा विसरला होता. म्हणून परत चश्मा घेतला. यानंतर तिथून आम्ही मुंबईसाठी निघालो, तुम्हाला टोलनाके भरल्याचे माझ्याकडे पुरावे मिळतील, त्यामुळे भेट घेतली की नाही हे लक्षात येऊ शकते, असे स्पष्टीकरण कासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
"बारामतीहून मी मुंबईतील सिल्वर ओक या बंगल्यावर रात्री २.३० वाजता पोहोचले, त्याही पुढे तुम्ही आमची भेट झाल्याचे सांगत असाल तर तुम्ही सिल्वर ओकचे कॅमेरे तपासू शकता, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंचे अमित शहा यांना प्रत्युत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन त्यांनी बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर एक चकार शब्ददेखील काढला नाही. केंद्र सरकार ईस्ट इंडिया कंपनीसारखे सर्व राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करत आहे. पक्ष फोडा, घरं फोडा या पॉलिसी विरोधात व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आगामी निवडणुका महत्वाच्या असणार आहेत. आमच्यावर काहीही टीका झाली असली तरी मला एका गोष्टीचं बरं वाटलं की, आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावर खोचक टोला लगावला.