पक्षविरोधी कारवायांप्रकरणी काँग्रेसच्या २३ सदस्यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 06:51 AM2024-01-16T06:51:27+5:302024-01-16T06:51:46+5:30

मिलिंद देवरा यांच्या बंडखोरीनंतर समर्थकांची हकालपट्टी

Suspension of 23 members of Congress for anti-party activities | पक्षविरोधी कारवायांप्रकरणी काँग्रेसच्या २३ सदस्यांचे निलंबन

पक्षविरोधी कारवायांप्रकरणी काँग्रेसच्या २३ सदस्यांचे निलंबन

मुंबई : काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसने पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचे निलंबन केले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी रविवारी संध्याकाळीच देवरा यांच्यासह शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. 

देवरा यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेविका सुशीबेन शहा, सुनील नरसाळे, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव हे माजी नगरसेवक, दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि ॲड. त्र्यंबक तिवारी यांच्यासह २३ पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

या २३ जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल गायकवाड यांनी रविवारी रात्री त्यांचे निलंबन केले. गायकवाड यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील कार्यकर्त्यांशी एक-एक करून दिवसभर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सर्व कार्यकर्त्यांना पक्षाकडून हवे ते पाठबळ मिळेल, अशी ग्वाही दिली.

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात गर्दी
सोमवारी सकाळी ३०० पेक्षा जास्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात गर्दी करीत दक्षिण मुंबई अजूनही काँग्रेससोबतच असल्याची ग्वाही दिली. यात आमदार अमीन पटेल, ज्येष्ठ नेते भवरसिंह राजपुरोहित, पालिकेतील माजी विरोधी पक्षेनेते ज्ञानराज निकम, किशन जाधव, अश्फाक सिद्दीकी, पूरन दोशी आदी नेत्यांचा समावेश होता.

ते लोक होते वेगळे
पक्ष, विचारधारा यांच्याशी प्रामाणिक राहून काम करणारे लोक यशस्वी होतात; पण एक व्यक्ती सोडून गेल्याने ना पक्ष खिळखिळा होत ना विचारधारा कमकुवत होत! उलट त्यामुळे काम करायला बळ मिळाले आहे. सुरेश भटांची एक गझल आहे. ‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी वाट थांबून पाहतो, मागे किती जण राहिले?’ हे मागे राहिलेले सच्चे काँग्रेसी आहेत आणि तेच पक्षाला विजयपथावर नेतील.
– प्रा. वर्षा गायकवाड,
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा 

Web Title: Suspension of 23 members of Congress for anti-party activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.