प्रस्तावित कुलाबा जेट्टीबाबत रहिवाशांना विश्वासात घ्या; राहुल नार्वेकर यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 06:51 IST2025-03-30T06:50:45+5:302025-03-30T06:51:11+5:30
Mumbai News: गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लबदरम्यान २२९ कोटी रुपये खर्चाची जेट्टी आणि टर्मिनल प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबद्दल रहिवाशांचे समाधान करणे महत्त्वाचे आहे. त्यांना विश्वासात घेऊन संबंधित विभागाने प्रकल्पासाठी मिळालेल्या सर्व मंजुऱ्या रहिवाशांसमोर ठेवाव्यात

प्रस्तावित कुलाबा जेट्टीबाबत रहिवाशांना विश्वासात घ्या; राहुल नार्वेकर यांची सूचना
मुंबई - गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लबदरम्यान २२९ कोटी रुपये खर्चाची जेट्टी आणि टर्मिनल प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबद्दल रहिवाशांचे समाधान करणे महत्त्वाचे आहे. त्यांना विश्वासात घेऊन संबंधित विभागाने प्रकल्पासाठी मिळालेल्या सर्व मंजुऱ्या रहिवाशांसमोर ठेवाव्यात, असे विधानसभा अध्यक्ष आ. राहुल नार्वेकर यांनी शनिवारी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना सांगितले.
विधान भवनात पार पडली बैठक
नवीन कुलाबा जेट्टी प्रकल्पाबाबत रहिवाशांनी पर्यावरण आणि वाहतुकीबद्दल अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी मंत्री राणे आणि स्थानिक रहिवासी यांची बैठक विधान भवनातील अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली होती.
मंत्री राणे म्हणाले, हेरिटेज कमिटी आणि इतर संबंधित विभागाच्या परवानग्या मिळाल्या आहेत. येथे वाहतूक सुरळीत होण्यासाठी ट्रॅफिक सिम्युलेशन अभ्यास केला आहे. प्रकल्पामुळे गेटवे ऑफ इंडिया येथील विद्यमान जेट्टीवरील ताण कमी होईल.
तर रहिवाशांना त्यांची कागदपत्रे दिल्यानंतर ते समाधानी आहेत की नाही हे समजून घेण्यासाठी पुन्हा बैठक घेऊ, असे भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.