बाकी कुणाबद्दलही बोला; बापाचा नाद करायचा नाही...; सुप्रिया सुळे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 07:02 AM2023-07-06T07:02:53+5:302023-07-06T07:03:08+5:30
‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी.’
बाकी कुणाबद्दलही बोला; बापाचा नाद करायचा नाही - खासदार सुप्रिया सुळे
‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी.’ हा बाप माझ्या एकटीचा नाही, तो माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. एक सांगते, बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला, आमच्यावर काहीही बोला; पण बापाचा नाद नाही करायचा. एक सांगते, महिला आहे मी. छोटंसं बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, ताराराणी होते आणि जिजाऊ होते. काही लोकांचे वय झालंय त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत, असे माझ्या ऐकण्यात आले. का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटा साहेबांपेक्षा तीन वर्षांनी मोठे आहेत आजही टाटा ग्रुप पोटतिडकीने चालवतात, त्यांचे वय ८६. सिरम इन्टिट्यूटचे सायरस पुनावालांचं वय ८४, अमिताभ बच्चन ८२, फारुक अब्दुला साहेबांपेक्षा तीन वर्षे मोठे आहेत. वय हा नंबर आहे, जिद्ध पाहिजे. आशीर्वाद तर आहेतच; पण आपल्या वडिलांना म्हणायचं घरात बसा आणि आशीर्वाद द्या, मग आम्ही पोरी परवडल्या हो.
...हा तर निष्ठेचा चिखल- खासदार अमोल कोल्हे
असं म्हणतात पाण्याचा पाऊस पडला की मातीचा चिखल होतो आणि ईडी, सीबीआय, स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो, हे आज महाराष्ट्रात बघायला मिळतंय. रविवारी घडले हे देशात पहिल्यांदा घडले नाही, हे वारंवार घडतंय. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात घडलं, त्याआधी मध्य प्रदेशात घडलं; पण हे घडलं म्हणून रडत बसणाऱ्यातले आम्ही नाही. आमिष आणि धोका सोडून जे वाटेवर राहतात त्यांच्या मागे तत्त्वांची आणि नैतिकतेची बैठक असते.
या योद्ध्याचा भारतात दरारा!- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
हा पक्ष मोडण्याचा २५ वर्षांत अनेकांनी अनेकवेळा प्रयत्न केला. कुणीच त्यांना दाद दिली नाही. पण आज काही लोक बाजूला गेले त्याचे आम्हाला शल्य आहे. या व्यासपीठावर पवारांच्या दोन्ही बाजूला बसणारे इथे नाहीत. कोणाच्या तरी अडचणी असतील, प्रसंग आले असतील. पण त्या सगळ्या प्रसंगात अनेकवेळा तुमच्या मागे उभे राहण्याचे काम शरद पवारांनी केले. ज्याचे अनिल देशमुख मूर्तिमंत उदाहरण आहे. वय कितीही झाले तरी या योद्ध्याचा भारतात दरारा आहे. पवारसाहेबांच्या शब्दाच्या पलीकडे आम्ही जात नाही यापेक्षा माझी दुसरी काय चूक आहे? बापाला कधी विसरायचे नसते.
जखमी शेर खतरनाक असतो! - आमदार जितेंद्र आव्हाड
तुम्हाला निवडणूक प्रचारासाठी शरद पवार लागतात आणि एखाद्या दिवशी तुम्ही म्हणाल आम्हाला तुम्ही नको. तुम्हाला गट म्हणून राहता येणार नाही. पक्षात प्रवेश करावा लागेल. एकही आमदार अपात्र झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने नाड्या घट्ट आवळल्या आहेत. राजकीय पक्ष आपला आहे, ३० वर्षे घाम गाळून पक्ष उभा केला. आजारी असताना साहेब लढले. २००९ साली रक्त गळत होतं तरी प्रचारासाठी बाहेर पडले. गुरूवर वार करायचे व नमस्कार करायचा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही साहेबांना जखमी केले आहे, जखमी शेर खतरनाक असतो. जे आमदार साहेबांबरोबर राहतील तेच वाचतील; बाकीचे अपात्र ठरतील.
...पूर्वीच सरकार पडले असते- आमदार अनिल देशमुख
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. मी गृहमंत्री असताना मलाही खोट्या आरोपात गोवण्यात आले होते. १४ महिने जेलमध्ये टाकले. जेलमध्ये जाण्याआधी मला विरोधी पक्षाकडून प्रस्ताव आला होता, तुम्ही हे प्रतिज्ञापत्र करून द्या तुमच्यामागे ईडी नाही, सीबीआय नाही. मी तुम्हाला सांगतो मी जर अडीच वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून दिले असते तर यापूर्वीच आपले सरकार पडले असते; पण मी सांगितले अनिल देशमुख जेलमध्ये जाईल; पण पक्षाशी गद्दारी करणार नाही.