गुजरातला १ हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या; अजित पवारांचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 02:46 PM2021-05-31T14:46:26+5:302021-05-31T14:48:51+5:30

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबई मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीचं उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं.

tauktae cyclone give as much as you think is right to Maharashtra Ajit Pawar slammed Modi | गुजरातला १ हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या; अजित पवारांचा मोदींना टोला

गुजरातला १ हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या; अजित पवारांचा मोदींना टोला

googlenewsNext

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबई मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीचं उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी एमएमआरडीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. 

एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. त्यात रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात राज्याची कोणती कामं असतील काही मागण्या असतील तर सांगा मी त्या केंद्रापर्यंत पोहोचवून कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करतो, असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी रामदास आठवले यांच्याकडे दोन महत्वाच्या मागण्या करत मोदी सरकारवर निशाणा साधला.  

"रामदास आठवले मला आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले की केंद्राकडून काही मदत हवी असल्यास कळवा. माझा रामदास आठवलेंना एवढीच विनंती आहे की तुम्ही केंद्रात आहात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करुन द्या तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा मोदींनी केवळ गुजरातचा दौरा केला आणि तातडीनं १ हजार कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्रात ते का आले नाहीत? हे अद्याप काही कळालेलं नाही. गुजरातला १ हजार कोटी दिलेत. महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, असा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा", असं अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले.

पेट्रोलच्या शंभरीवरुनही केंद्रावर निशाणा
मुंबईतील विविध रस्त्यांची कामं आणि भविष्यात आवश्यक गोष्टींची माहिती करुन देताना अजित पवार यांनी पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीवरुही भाष्य केलं आणि रामदास आठवलेंकडे आणखी एक विनंती केली. "मुंबईत विविध पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत आणि आगामी काळात आणखी कामं होतीलही. पण पेट्रोलच्या दरानं आता काही शहरात शंभरी गाठली आहे. त्यामुळे आठवले साहेब केंद्राला पेट्रोलच्या किंमतीतही लक्ष घालायला सांगा", असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला. 

विकासाला खीळ बसली नाही
"राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांमध्ये कोरोनाचं संकट आलं. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ, कोरोनाची दुसरी लाट आणि नुकतंच येऊन गेलेलं तौत्के चक्रीवादळ अशी एकामागोमाग एक संकटं येत असतानाही राज्यातील विकास कामांचा कुठेच खीळ बसू दिली नाही. राज्याचा आर्थिक गाडा थोडा रुळावरुन खाली घसरला असला तरी कामांना खीळ बसू दिली नाही", असं अजित पवार यावेळी म्हणाले. 
 

Read in English

Web Title: tauktae cyclone give as much as you think is right to Maharashtra Ajit Pawar slammed Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.