"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:22 PM2024-05-13T22:22:16+5:302024-05-13T22:24:34+5:30
भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांचा मुंबईतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Tejasvi Surya vs Rahul Gandhi | मुंबई: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच लाट असून इंडी आघाडी हतबल आणि निराश झाली आहे. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता येईल, असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोमवारी व्यक्त केला. मुंबईतील दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी मोदींना दिलेल्या 'डिबेट'च्या आव्हानाचा खरपूस समाचार घेतला. मुंबईतील लोकसभेचे उमेदवार पीयूष गोयल, ॲड. उज्ज्वल निकम, मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ दाैरा होता. त्यानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन त्यांनी वसंत स्मृती सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला.
तेजस्वी सूर्या म्हणाले, "मी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांचा दौरा केला. त्यात सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद पंतप्रधान मोदींना मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे वादळ आहे. काँग्रेस नेत्यांची विधाने भारताचे विभाजन करणारी आणि देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी आहेत. काँग्रेस पक्ष देशासाठी घातक आहे. नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्यासोबत डिबेट करतील मात्र, राहुल गांधी यांनी स्वतःला निदान पंतप्रधान पदासाठी अधिकृत उमेदवार घोषित करावे. मोदी यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी त्या बरोबरीची व्यक्तीसमोर असायला हवी."
काँग्रेसचा जाहीरनामा देशाचे नुकसान करणारा
"काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचा पराभव होत असल्यामुळेच ते पैसे वाटत असल्याचा आरोप करीत आहे. भाजपाचा जाहीरनाम्यात लोकहितासारख्या बाबी घेतल्या आहेत. पण काॅग्रेसच्या जाहीरनाम्यात लोकहिताचे काहीच नाही. काँग्रेसचा जाहीरनामा देशाचे नुकसान करणारा आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना एकही बॉम्बस्फोट झाला नव्हता. मात्र, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बॉम्बस्फोटाची घटना घडली. अल्पसंख्याकांचे लांगुलचालन सुरू आहे. उघड उघड भारत विरोधी घोषणा दिल्या जातात. काँग्रेसने मुस्लिम आरक्षण लागू करून ओबीसींचे आरक्षण लुटण्याचे काम केले आहे," अशी टीका त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये 'ऑपरेशन लोटस' होणार का?
लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये 'ऑपरेशन लोटस' होणार का? असा प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "कर्नाटकमध्ये आमदारांना सांभाळण्याचे काम हे काँग्रेस पक्षाचे आहे. ते भाजपाचे नाही.
संजय राऊतांना टोला
"राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची रोज होणारी वक्तव्ये ही मनोरंजनात्मक असतात, त्यांची वक्तव्य अनेक वर्ष मी ऐकत आलो आहे", अशा शब्दांत त्यांनी राऊतांना टोला लगावला.