सांगा आमदार कुणाकडे?; शरद पवारांबरोबर २५ आमदार असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 06:47 AM2023-07-08T06:47:13+5:302023-07-08T06:47:33+5:30
५ जुलै रोजी बोलवलेल्या बैठकीला शरद पवार यांच्या बैठकीला १५ आमदार उपस्थित होते, तर ४ आमदारांनी पवारांबरोबर असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते.
मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोणत्या पक्षाकडे किती आमदार याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे २५ आमदार असल्याचा दावा पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. १९ आमदारांनी शरद पवारांना पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. तर सध्या अजित पवारांकडे असलेल्या ६ आमदारांनी शरद पवारांना लवकरच बरोबर येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचेही या नेत्याने सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी ५ जुलै रोजी बोलवलेल्या बैठकीला शरद पवार यांच्या बैठकीला १५ आमदार उपस्थित होते, तर ४ आमदारांनी पवारांबरोबर असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते.
अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला ३२ आमदार उपस्थित होते. अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या ३२ पैकी ६ आमदारांनी शरद पवारांना फोन करून आपण भविष्यात तुमच्याबरोबर येत असल्याचे सांगितल्याचा दावा पवार गटाच्या या नेत्याने केला आहे. असे झाले तर अजित पवार यांच्याकडे २६ आमदार राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हे नऊ सोडून इतरांना दारे उघडी असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवारांकडे ४४ पेक्षा अधिक आमदार
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेमके किती आमदारांचे संख्याबळ आहे, याचे कोडे अजूनही अनेकांना सुटलेले नाही. अशात अजित पवार गटाचे प्रतोद आणि कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी ४४ पेक्षा अधिक आमदार आमच्याकडे आहेत. लवकरच राष्ट्रवादीचे सर्वच सोबत येतील, असा दावा केला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार तातडीने : मुख्यमंत्री
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तातडीने केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. मंत्रिपदावरून आपल्या पक्षात कोणतेही रुसवे-फुगवे नाहीत, असे ते म्हणाले. शिंदे म्हणाले की, अजित पवार जेव्हा विरोधात होते तेव्हा आमच्या लोकांचेही त्यांच्याशी सख्य असण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे अचानक त्यांच्या सरकारमध्ये येण्याने काही प्रतिक्रिया उमटल्या. आमचे आमदार सत्तेच्या लालसेने खुर्चीसाठी आलेले नाहीत. आमचे आमदार समजदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात विकास करू पाहतात. मंत्रिपद काही कायम नसतात. विरोधक मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तातडीने होईल.