“देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 09:44 IST2025-02-02T09:42:38+5:302025-02-02T09:44:51+5:30
Thackeray Group MP Sanjay Raut News: इतिहास एकनाथ शिंदे व अजित पवार यांना माफ करणार नाही. शिंदेंचे २१ आमदार देवेंद्र फडणवीस यांचेच नेतृत्व मानत आहेत. शिंदे-फडणवीसांचे पटत नाही. बहुमत असून सरकार व राज्य अस्थिर आहे, असे दावे संजय राऊतांनी केले.

“देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी”: संजय राऊत
Thackeray Group MP Sanjay Raut News: एकनाथ शिंदे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची तोडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही. निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व २०२४ नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत खर्च करा, असे आश्वासन अमित शाह यांनी शिंदे यांना दिले होते. एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत प्रचंड पैसा टाकला, पण शाह यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे एकनाथ शिंदे यांना वाटते, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे.
आपले 'लाडके' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपपुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंधच राहिलेले नाहीत याची प्रचिती देणारे प्रसंग रोज घडत आहेत. शिंदे गटाचे एक त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले. त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन गोंधळ वाढवला. या आमदाराने पुढे माहिती दिली ती महत्त्वाची आहे. त्यांचे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत, असे शिंदे यांना खात्रीने वाटते व दिल्लीच्या तपास संस्था आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण एकनाथ शिंदे यांची आता पुरती कोंडी झाली आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्याला विचारत नाहीत याचे एकनाथ शिंदेंना मोठे दुःख
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत शिंदे व त्यांचे लोक कोठेच दिसत नाहीत. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंवर झोत होता तो संपला आहे व मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारत नाहीत या दुःखात स्वतः शिंदे अखंड डुंबले आहेत.फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे. दुःखाचा कडेलोट झाला की, उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकाप्टरने साताऱ्यातील दरेगाव गाठतात व डोके थोडे शांत झाले की, ठाण्याला परत येतात, पण डोके शांत झाले तरी त्यांचे मनःस्वास्थ्य सुधारत नाही. एकनाथ शिंदे यांचे मनःस्वास्थ्य आता इतके बिघडले आहे की, ते आता आमदारांवरच चिडचिड करतात असा खुलासा त्यांच्याच एका प्रिय आमदाराने केला, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही
फडणवीस हे आज सरकारचे प्रमुख आहेत व शिंदे हे कालपर्यंत त्याच सरकारचे प्रमुख होते व आता दोघांचे पटत नाही. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये फार मोठे मतभेद नाहीत. असे भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याने मला अलीकडेच सांगितले. शिंदे यांच्या बहुतेक आमदारांत आता चलबिचल आहे. त्यातील एक मोठा गट थेट भाजपात जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहे. दुसरा गट शिंदेंवर दबाव आणीत आहे. झाले गेले विसरून पुन्हा स्वगृही परतू, या चर्चा जोरात आहेत, पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या भयामुळे नेते निर्णय घेत नाहीत. शिंदे या सगळ्यांचे नेतृत्व किती काळ करू शकतील? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी
एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवार यांची स्थिती बरी अजित पवार यांनी त्यांच्या मर्यादा ओळखल्या आहेत व फडणवीस यांच्याशी त्यांचे नाते अधिक मजबूत आहे. सध्या अजित पवारांना काहीच व्हायचे नाही. त्यामुळे त्यांना अमित शाह यांच्या यादीतले जंटलमेन व्हायचे आहे. भाजपाबरोबर गेल्याने अजित पवार यांनी 'ईडी'ची कारवाई टाळली. एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा 'बोनस' म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळाले. या व्यवहारात अजित पवार खूश आहेत. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही व मुख्यमंत्री होण्यापेक्षा सुरक्षित बाहेर राहिलेले बरे हे धोरण पवारांनी स्वीकारले. पुन्हा धनंजय मुंडे यांचाही बचाव होत आहे. पण शिंदे यांचे तसे नाही. ठाकरे मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच होते व फडणवीस मंत्रिमंडळात असतानाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनायचे आहे. हा धोका फडणवीस यांनी ओळखला आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
शिंदे गटातील २१ आमदारांना देवेंद्र फडणवीसांचा नेतृत्व मान्य
शिंदे यांच्या सोबत असलेले किमान २१ आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतात व फडणवीस यांच्या सूचनेनुसारच ते सुरतला गेले हे सत्य शिंदेही जाणतात. त्यामुळे शिंदे गट आजही एकसंध नाही. शिंदे हे स्वतःच डळमळीत झाल्याचे स्पष्ट जाणवते व समोर येऊन लढण्याचे बळ त्यांच्यात अजिबात नाही. शिंदे यांना सध्या अमित शाह यांचे ते वरवरचे व कामापुरते आहे. ते नसेल तेव्हा शिंदे यांचे नेतृत्व संपलेले असेल. अमित शाह यांचा रस शिंदे यांच्यात नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्यात व मुंबईवर पूर्णपणे ताबा मिळविण्यात आहे. शिंदे यांची मदत त्यांना त्यासाठी हवी. शाह यांचे काम झाले की, शिंदेंचे काम तमाम होईल हे नक्की. शिंदे यांच्या पक्षाकडे कोणतेही धोरण नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद आहेत व गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले. त्यामुळे खाण उद्योग भयमुक्त झाला. शिंदे यांनी ठाणे व मुंबईचे पालकमंत्रीपद एकाच वेळी स्वतःकडे ठेवले. त्यात आर्थिक हितसंबंध जास्त आहेत. बहुमत असूनही सरकार व राज्य अस्थिर आहे. इतिहास एकनाथ शिंदे व अजित पवार यांना माफ करणार नाही हे नक्की, या शब्दांत संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून हल्लाबोल केला आहे.