"ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं"; देशमुखांचं अजित पवार गटाला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:32 AM2023-10-10T10:32:20+5:302023-10-10T10:58:49+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाविषयी निवडणूक आयोगापुढे सुरू असलेली सुनावणी आता तब्बल एक महिन्यानंतर, ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

"The 83-year-old father who raised you"; Anil Deshmukh's challenge to Ajit Pawar group | "ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं"; देशमुखांचं अजित पवार गटाला चॅलेंज

"ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं"; देशमुखांचं अजित पवार गटाला चॅलेंज

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटातील मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला अजितदादा गटातील मंत्र्यांसह काही समर्थक आमदारही उपस्थित आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या हक्काची सुनावणी न्यायालयात सुरू असून शरद पवार यांनी स्वत: उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी, युक्तीवाद करताना अजित पवार गटाच्या वकिलांकडून शरद पवारांचा हुकूमशहा असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर, राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाविषयी निवडणूक आयोगापुढे सुरू असलेली सुनावणी आता तब्बल एक महिन्यानंतर, ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा करताना अजित पवार गटाने ही सुनावणी तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली. पण निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९ नोव्हेंबरची तारीख दिली. 

पक्षावर कोणतीही एक व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही. पण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात लोकशाही नाही, असा आरोप अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल यांनी केला, तर अजित पवारांकडे असलेल्या आमदारांची नावे आयोगापुढे का सादर केली नाही, असा सवाल शरद पवार गटाने केला. दरम्यान, पहिल्या सुनावणीतही अजित पवार गटाकडून हुकूमशाहीचा आरोप करण्यात आला होता. त्यावर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना डोळ्यात अश्रू तरळल्याचं म्हटलं होतं. आता. अनिल देशमुख यांनीही अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.  

''ज्या ८३ वर्षांच्या बापाने  तुम्हाला मोठं केलं. त्यांच्याच जीवावर तुम्ही सत्तेची फळ चाखलित. स्वतःची संस्थानं उभी केलीत, आज त्याच बापाला तुम्ही हुकूमशहा म्हणत आहात. थोडी तरी लाज बाळगा,'' अशा शब्दात माजी मंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, तुमच्यात हिम्मत असेलच तर स्वतःचा पक्ष काढा आणि निवडणुका लढवून बघा, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असं चॅलेंजही दिलं आहे. 

काय म्हणाले आव्हाड

समोरच्या पक्षाकडील वकीलाने अत्यंत उद्धटपणाने ‘शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकुमशहा सारखा पक्ष चालवला’ हे ते वारंवार बोलत होते. हे ऐकल्यानंतर मात्र डोळ्यात अश्रू उभे राहीले. की, ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच, ज्यांच्यामुळे साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळं मिळालं त्यांनीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल अशी निवेदनं वकिलामार्फत करायला लावणं हे दुर्देवं आहे, असा प्रसंग आव्हाड यांनी भावनिक शब्दात कथन केला होता.

Web Title: "The 83-year-old father who raised you"; Anil Deshmukh's challenge to Ajit Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.