सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिंमत, नाना पटोलेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 17:14 IST2023-07-21T17:10:15+5:302023-07-21T17:14:56+5:30
Nana Patole Criticize BJP: सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर टीका करणारं ट्विट भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलं होतं. या ट्विटवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिंमत, नाना पटोलेंचा घणाघात
मणिपूरमध्ये महिलांच्या काढण्यात आलेल्या विवस्त्रावस्थेतील धिंडीची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी घेतली होती. तसेच सरकार कारवाई करत नसेल तर आम्ही करू, असे खडेबोल सुनावले होते. सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर टीका करणारं ट्विट भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलं होतं. या ट्विटवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजपा आमदाराची हिंमत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे. या प्रकरणी आम्ही राज्यपाल व मा. सरन्यायाधीशांना अवगत करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, मणिपूर तीन महिन्यापासून जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, फ्रान्सच्या दौऱ्यात व्यस्त होते तेथून देशात आले तर पक्षाचा प्रचार करण्यात मग्न राहिले. मणिपूरवर एक शब्दही त्यांनी काढला नाही. ७८ दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मौन सोडत, ‘कोणालाही सोडणार नाही’ असे विधान केले. एवढे बोलण्यास त्यांना तीन महिने लागले. सुप्रीम कोर्टाने मणिपूर प्रकरणाची दखल घेत सरकारने कारवाई करावी अन्यथा कोर्ट कारवाई करेल असे म्हटले होते, त्यांची चिंता स्वाभाविकच आहे. सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर राज्यातील भाजपाच्या एका आमदाराने टीका करत कोर्टालाच सुनावणारे ट्वीट केले आहे. सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजपा आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे. या प्रकरणी राज्यपाल व मा. सरन्यायाधीश यांना अवगत करू असे नाना पटोले म्हणाले.
भाजपाच्या राज्यात महिलेची विवस्त्र धिंड काढून बलात्कार केला ही हैवानियत आहे. या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. देशाला कलंक लावण्याचे काम केले आहे. भारताच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे हे कृत निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करत आहे, असेही पटोले म्हणाले.