निर्णय पक्का, शिवाजी पार्क फक्त खेळांसाठीच राहणार; उच्च न्यायालयात राज्य सरकारने आधीच दिले आहे प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:27 AM2022-02-10T11:27:06+5:302022-02-10T11:27:32+5:30

या मैदानावर खेळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली.

The decision is final, Shivaji Park will be for sports only; The affidavit has already been filed by the state government in the high court | निर्णय पक्का, शिवाजी पार्क फक्त खेळांसाठीच राहणार; उच्च न्यायालयात राज्य सरकारने आधीच दिले आहे प्रतिज्ञापत्र

निर्णय पक्का, शिवाजी पार्क फक्त खेळांसाठीच राहणार; उच्च न्यायालयात राज्य सरकारने आधीच दिले आहे प्रतिज्ञापत्र

googlenewsNext

रोहित नाईक -

मुंबई : शिवाजी पार्क मैदान खेळण्यासाठी आहे. वर्षभरात केवळ ३० दिवस येथे सभा व कार्यक्रमांचे आयोजन करता येईल, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आहे. भाजप-शिवसेनेच्या काळात हे प्रतिज्ञापत्र सादर झाले आहे. त्यामुळे येथे भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी जोर धरत असली तर खेळाव्यतिरिक्त हे मैदान वापरण्यास कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही.

या मैदानावर खेळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली.  हे मैदान मनोरंजन मैदान आहे की नाही, असाही मुद्दा पुढे आला. अखेर वर्षांतून ३० दिवस हे मैदान खेळा व्यतिरिक्त वापरण्यास परवानगी असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सादर केले.  या ३० दिवसांत दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाढवानिमित्त होणारा मेळावा यांचाही समावेश करण्यात आला. 

 न्यायालयाच्या सूचना - 
- खेळाव्यतिरिक्त ३० दिवस मैदानाचा इतर कार्यक्रमांसाठी वापर होईल.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, नौदल दिन, १ मे व २६ जानेवारी हे दिवस वगळून इतर दिवशी हे मैदान खेळण्यासाठी वापरले जाईल.
- या ३० दिवसांमध्ये दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडव्यानिमित्त होणारा मेळावा यांचाही समावेश करण्यात आला.
- एखादा शासकीय कार्यक्रम मैदानावर घ्यायचा असल्यास तो विशेष अधिकारात घेण्याची तरतूद आहे.

क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर -
काही दिवस प्रशासनाने स्वत:साठी विशेष अधिकार म्हणून राखून ठेवले आहेत. म्हणून एखादा शासकीय कार्यक्रम मैदानावर घ्यायचा असल्यास तो विशेष अधिकारात घेण्याची तरतूद आहे. 

भाजप आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्क मैदानात लतादीदींच्या स्मारक उभारणीची मागणी केल्यानंतर अनेक मतभेद सुरू झाले. यामध्ये क्रीडा संघटक आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

स्मारकाबाबत काहीच कल्पना नाही. हे सर्व राजकीय मुद्दे आहेत. बाहेरच्या देशांमध्ये मोठमोठ्या लोकांच्या घरालाच स्मारकाचे स्वरूप देण्यात येते. लतादीदी क्रिकेटप्रेमी होत्या; पण क्रिकेट मैदानामध्ये आपले स्मारक व्हावे, हे त्यांनाही आवडणार नाही. येथे स्मारकासाठी जागाही दिसत नाही. सरकार मैदानात स्मारक होऊ देणार नाही, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. स्मारकासाठी इतर स्थळांचा विचार व्हावा.    
 - संजीव खानोलकर, सचिव, शिवाजी पार्क जिमखाना

लतादीदी मोठे व्यक्तिमत्त्व होते आणि राहणार, याबाबत दुमत नाही. शिवाजी पार्कसारखे खुली मैदाने उरलेली नाहीत. खेळाचे मैदान हे खेळासाठीच राहावे. सध्याच्या कोरोना परिस्थितीकडे पाहता खेळल्याने तुमची रोगप्रतिकारक्षमता वाढते. याकडे लक्ष देऊन संबंधितांनी योग्य तो निर्णय घ्यावा. लतादीदींचे कार्य महान असून, त्यांनी भारतीय संगीत भारताबाहेर नेले; पण त्यांचे स्मारक मैदानात नको.           
 - विश्वास मोरे, पंच समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना

‘या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार’, असं म्हणणाऱ्या लतादीदींचं स्मारक खेळाच्या जागेवर करणं त्यांना तरी आवडलं असतं का? त्या स्वत: क्रिकेटप्रेमी होत्या. खेळावरील अतिक्रमण त्यांना रुचलं असते का? लतादीदींचं स्मारक भव्यदिव्य व्हावं, अशी आमचीही इच्छा आहे; पण त्यासाठी शिवाजी पार्क ही जागा नव्हे. त्यामुळे विनंती आहे की, यासाठी दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा. 
- उदय देशपांडे, शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते, मल्लखांब प्रशिक्षक
 

 

Web Title: The decision is final, Shivaji Park will be for sports only; The affidavit has already been filed by the state government in the high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.