राष्ट्रवादीत फूट पडल्याचे निवडणूक आयोगाने केलं मान्य; ६ ऑक्टोबरला दोन्ही गटांना बोलावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 10:04 PM2023-09-14T22:04:38+5:302023-09-14T22:05:13+5:30
राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबई- राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. आता राष्ट्रवादीतील फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. पक्षातील खासदार शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने बोलावलं आहे. यामुळे आता पक्षावर नेमका कोणता गट दावा सांगणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे मान्य केलं असून दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.
'...तर मला इतकी मेहनत करावी लागली नसती', PM मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका
निवडणूक आयोगात ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सुनावणीसाठी ६ ऑक्टोबर रोजी बोलावले आहे.
६ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रवादीतील दोन्ही गटासाठी महत्वाचा आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात पक्षावर दावा सांगितला होता. यानंतर शरद पवार गटाकडूनही पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता, शिवसेनेचाही गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच वाद निवडणूक आयोगात सुरू होता. आता तसाच वाद राष्ट्रवादी काँग्रेसचाही सुरू होणार असल्याचे दिसत आहे.
खासदार शरद पवार यांनी नऊ आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केल्याचे बोलले जात आहे. तसेच निवडणूक आयोगात अजित पवार गटाने केलेले दावेही शरद पवार गटाने फेटाळले आहेत. यात २०२२ मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारणी झाली आहे त्याचे दाखले दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याचा आकडा अजुनही समोर आलेला नाही. तर आता दुसरीकडे दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात पक्षाचे नाव आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला जात आहे. या संदर्भात आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहेत.